प्रभात वृत्तसेवा वडगाव मावळ – भावकीतील मुलीला शाळेतून घरी पोहचविल्याच्या कारणावरून चौघांनी मिळून एका तरुणाला मारहाण केली आणि त्याच्या चुलत भावावर गोळीबार केला. ही घटना सोमवारी (8 सप्टेंबर) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास एकवीरा चौक, केशवनगर वडगाव येथे घडली.अक्षय एकनाथ मोहिते (२८, वडगाव मावळ) यांनी याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सौरभ रोहिदास वाघमारे (खेड), अभिजित राजाराम ओव्हाळ, रणजीत बाळासाहेब ओव्हाळ (सांगवी, मावळ), प्रथमेश दिवे (तळेगाव दाभाडे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अक्षय यांचा चुलत भाऊ दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. त्याने अभिजीत व रणजीत यांच्या भावकीतील मुलीला सोमवारी दुपारी शाळेतून घरी सोडले. त्याच दिवशी सायंकाळी अक्षय यांच्या चुलत भावाला आरोपींनी जबरदस्तीने कार मध्ये बसवून मारहाण केली होती. त्यानंतर अक्षय हे केशवनगर येथील एकवीरा चौकात बसले असताना आरोपी तिथे आले. त्यांनी अक्षय यांना शिवीगाळ केली. पिस्तूल काढून गोळीबार केला. पहिला राऊंड फायर झाला नाही. त्यामुळे आरोपींनी दुसरा राऊंड फायर केला. घाबरलेले अक्षय आणि त्यांचे मित्र जवळच्या सोसायटी मध्ये लपून बसले. गोळीबार केल्यानंतर आरोपी पळून गेले.या गोळीबारमध्ये कोणीही जखमी झालेले नाही. वडगाव पोलिसांनी चौघांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न व शस्त्र अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल केला असून,आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व वडगाव मावळ पोलिस स्टेशनच्या दोन पथकांनी अभिजित राजाराम ओव्हाळ, रणजित बाळासाहेब ओव्हाळ (दोघेही रा. सांगवी, ता. मावळ) व प्रथमेश दिवे (रा. तळेगाव दाभाडे) यांना अटक केली आहे. तर सौरभ वाघमारे हा फरार आहे. पोलिस निरीक्षक कुमार कदम तपास करीत आहेत.