Pimpri : पवनानदी परिसरातील बेकायदेशीर बांधकामावर हातोडा

पवन मावळ : मावळ तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून पवना धरण आणि पवना नदीपात्र परिसरात धनदांडग्यांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे करुन बंगले, फार्महाऊस, हॉटेल व्यवसाय थाटले आहेत. या अनधिकृत बांधकामांकडे अधिकारी वर्गही कानाडोळा करताना दिसतात.
तसेच राजकीय पाठबळाने परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाल्याचे समोर आले आहे. अशाच एका पवना नदी पात्रालगत असलेल्या कडधे गावच्या हद्दीतील बेकायदेशीर बांधकामावर पाटबंधारे विभागाने हातोडा चालविला आहे.
पवनानदी परिसरातील बेकायदेशीर बांधकामे हटवून या भागातील पर्यावरणाचा ऱ्हास थांबवा आणि निसर्गाने नटलेला परिसर कायम राहावा, या हेतूने अनधिकृत बांधकामे पाडण्यात येत आहे. पवना पाटबंधारे विभागाच्या जागेवर असलेल्या पवनाधरण व पवनानदी परिसरातील अनेक बेकायदेशीर बांधकामाना गेल्या काही महिन्यांपासून नोटीसा देण्यात आल्या होत्या. परंतु त्यानंतरही अतिक्रमण न हटविल्याने पाटबंधारे विभागाच्या वतीने कारवाई सुरु करण्यात आली आहे.
कडधे गावच्या हद्दीतील अनधिकृत बांधकाम पाडत असताना पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी सचिन गाडे, शाखाभियंता रुपेश गावित, रजनीश बारिया यांच्यासह मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला होता.
पवनानदी पात्राच्या जागेवर सदर व्यक्तीने बेकायदेशीर बांधकाम केले होते. सदर व्यक्तीला अनेकदा नोटीस देऊनही अतिक्रमण हटवले नसल्याने अखेर अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. पवनाधरण व पवनानदी पात्राच्या जागेवर कोणीही अतिक्रमण केल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
– सचिन गाडे, उपविभागीय अधिकारी – पाटबंधारे विभाग





