Pimpri : ठेकेदाराकडून झाडांची ‘कत्तल’, वृक्षप्रेमींचा संताप

खालापूर : खोपोली नगरपरिषद हद्दीतील डीपी रोड येथे वृक्षप्रेमींनी लावलेली अठरा झाडे नाल्याचे काम सुरू असताना ठेकेदाराने जेसीबी यंत्राच्या सहाय्याने उखडून टाकली. त्यामुळे वृक्षप्रेमी आणि नागरिक संताप व्यक्त करीत असून योग्य नियोजन केले असते तर झाडे वाचविता आली असती, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
लवजी, चिंचवली भागात विकसित होणाऱ्या डीपी रोड भागात म्हामुणकर चौकातून शिळफाटा येथे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला वृक्षप्रेमींनी ही झाडे लावली होती. ही झाडे बऱ्यापैकी मोठी झाली होती. परंतु, पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईचे काम करणाऱ्या ठेकेदाराने खोदाई करताना जेसीबीच्या मदतीने ही झाडे उखडून टाकली. विशेष बाब म्हणजे झाडांची अशी तोड होत असताना पालिकेचा एकही जबाबदार अधिकारी तिथे उपस्थित नव्हता, अशी तक्रार नागरिकांनी केली असून पालिकेच्या कारभारावर टीका होत आहे.
एकीकडे नगरपरिषद प्रशासन झाडे लावा, झाडे जगवा हा नारा देत वृक्षारोपणाचा ढोल वाजवित आहे. दुसरीकडे मात्र वृक्षप्रेमींनी लावलेली आणि चांगली वाढलेली झाडे सहजरित्या तोडून टाकत आहे. पालिकेच्या या कारभारावर संताप व्यक्त होत असून आता तोडली त्याच्या पाचपट झाडे पालिकेने व संबंधित ठेकेदाराकडून लावून घ्या आणि जगवून दाखवा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.





