Pimpri : कंटेनर चालक, क्लिनर पोलिसांच्या ताब्यात
मावळ : वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल मिथुन धेंडे यांचा मंगळवारी (दि. १३ मे) कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. एका भरधाव वेगातील कंटेनर चालकाने मिथुन धेंडे यांना ठोकर मारून गंभीर जखमी करून निघून गेला आणि गंभीर जखमी झालेल्या धेंडे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. याप्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या अटकेनंतर अपघाताचा घटनाक्रम उलगडला आहे.
वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिथुन धेंडे हे मंगळवारी (दि. १३) वडगाव फाटा येथे वाहतूक नियमन करीत होतो. तेव्हा एपीआय शीतलकुमार डोईजड हे पेट्रोलिंग करीत असताना मुंबईहून तळेगावकडे प्रवास करत असलेल्या नागरिकांनी माहिती दिली की, एक कंटेनरचा (क्रमांक एचआर ७४ बी ३६७७) चालक अत्यंत धोकादायकरित्या वाहन चालवित आहे. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पेट्रोलिंगच्या वाहनाचे चालक गणपत होले यांनी ही माहिती वडगाव नाका येथे वाहतूक नियमनाचे काम करीत असणारे मिथुन धेंडे यांना दिली. धेंडे यांनी ट्रॅफिक वार्डन आणि नागरिकांच्या मदतीने सदर कंटेनर वाहन मुंबई-चाकण मार्गावर थांबविले.
त्यावेळी वाहनातील चालकाने खाली उतरतो असे सांगितले, त्यामुळे धेंडे हे त्या वाहनाच्या पुढे डाव्या बाजूला उभे होते, पण अचानक वाहन चालकाने कंटेनर बेदकारपणे चालवून धेंडे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने धडक दिली व चाकण बाजूला निघून गेला. स्थानिकांनी हेड कॉन्स्टेबल मिथुन धेंडे यांना तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
आरोपींना अटक
सदर गुन्ह्यातील आरोपी वाहन चालकाविरोधात ट्राफिक वॉर्डन कुंडलिक पंढरीनाथ सुतार यांनी फिर्याद दिल्याप्रमाणे बी.एन.एस. कलम १०३(१), २८१, सह मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १७७, १८३, १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, पुढील काही तासात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिलीमकर यांच्या पथकाने पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मदतीने गुन्ह्यातील वाहन आणि आरोपीस ताब्यात घेतले. आरोपी रोहन इसब खान (वय २४, चालक, रा. ग्राम सिंगार, हरियाणा) आणि उमर दिन मोहम्मद (वय १८ वर्षे, क्लिनर, रा. ग्राम बरसाना, उत्तर प्रदेश) अशी आरोपींची नावे असून त्यांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम करीत आहेत.





