Pimpri : मार्च महिन्यात बांधकाम परवानगीचा पालिकेच्या तिजोरीला मोठा आधार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागास सन २०२४-२५ या आर्थिक वर्षांत एकूण ८८१ कोटी ३० लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पन्न ७७ कोटी रूपयांनी अधिक आहे. यंदा परवानग्यांमुळे वर्षभर उत्पन्नात घट दिसून येत होती परंतु आर्थिक वर्षाच्या अखेरच्या अर्थात मार्च महिन्यात उत्पन्नाचे उड्डाण घेतले आणि पालिकेच्या तिजोरीला मोठा हातभार लागला.
शहरातील मोठ्या बांधकाम प्रकल्पांना महाराष्ट्र राज्यातील पर्यावरण विभागाची ईएस प्रमाणपत्राऐवजी केंद्राच्या पर्यावरण विभागाच्या प्रमाणपत्राची सक्ती करण्यात आली आहे. त्या प्रमाणापत्रासाठी अधिक वेळ जात असल्याने महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाकडे मोठे प्रकल्प परवानगीसाठी येण्याचे प्रमाण जवळजवळ थांबले होते. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात मोठी घट दिसून येत होती. मात्र, मार्च महिन्यात अनेक बांधकामांना परवानगी दिल्याने यंदा उत्पन्नात वाढ झाल्याचे स्पष्टीकरण अधिकार्यांनी दिले आहे.
बांधकाम परवानगीच्या मुख्य शुल्कातून ७५० कोटी ६७ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. युटीएफ शुल्क १२८ कोटी ८९ लाख रूपये इतके आहे. इतर उत्पन्न १ कोटी ७४ लाख आहे. असे एकूण ८८१ कोटी ३० लाख रूपयांचे उत्पन्न महापालिका तिजोरीत जमा झाले आहे.
यंदा मार्च महिन्यामध्ये मोठ्या बांधकामांना परवानगी देण्यात आली. गेल्या दोन वर्षातील उत्पन्नापेक्षा यंदा उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. ही समाधानकारक बाब आहे.
– मकरंद निकम, शहर अभियंता
मागील चार वर्षांतील उत्पन्न
सन २०२१-२२ :१ हजार ६० कोटी
सन २०२२-२३ : ७८१ कोटी
सन २०२३-२४ : ८०४ कोटी
सन २०२४-२५ : ८८१ कोटी ३० लाख





