आकुर्डी : पिंपरी चिंचवड शहरात संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्काम करत असतो, त्या पार्श्वभूमीवर आकुर्डीतील पांडुरंग काळभोर सभागृह परिसरात ‘वारकरी भवन’ उभारावे, अशी मागणी माजी उपमहापौर शैलजा मोरे आणि महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे सचिव जयंत आप्पा बागल यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या निवेदनात असे म्हटले आहे की, दरवर्षी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी हजारो वारकऱ्यांसह आकुर्डीतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुक्काम करते. मात्र, जागेअभावी वारकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे वारकऱ्यांसाठी सुसज्ज ‘वारकरी भवन’ उभारून त्याठिकाणी निवास, स्वच्छता व अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी यावेळी शैलजा मोरे यांच्याकडून करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना भेटलेल्या या शिष्टमंडळात हभप अनिकेत मोरे, हभप जगन्नाथ नाटक पाटील, माजी नगरसेवक सुरेश भोईर, हभप दत्तात्रय साकोरे, किशोर पाटील, विनायक महाराज जगताप, राम साखरे यांच्यासह अनेक वारकरी उपस्थित होते. ‘वारकरी भवन’ उभारल्यास शहराच्या अध्यात्मिक संस्कृतीला बळकटी मिळेल, अशी भावना माजी उपमहापौर शैलजा मोरे यांनी यावेळी व्यक्त केली.