Pimpri : हरित सेतू प्रकल्पास नागरिकांचा विरोध

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने निगडी, प्राधिकरण या भागात प्रायोगिक तत्वावर हरित सेतू प्रकल्प राबविला जात आहे. पदपथ व सायकल ट्रॅक रूंद केल्याने रस्ते अरूंद होऊन वाहतूककोंडीची समस्या निर्माण होणार असल्याने या प्रकल्पास नागरिकांनी विरोध केला आहे. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन केले जाणार आहे. महापालिका प्रशासनाने दखल न घेतल्यास न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय यावेळी आयोजित बैठकीत घेण्यात आला आहे.
हरित सेतू प्रकल्पासंदर्भात चर्चा करण्यासाठी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक प्राधिकरण, निगडी येथील चिंतामणी मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत माजी महापौर आर. एस. कुमार, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आनंदराव मुळूक, पर्यावरणप्रेमी सूर्यकांत मुथियान, भाजपचे बाळा शिंदे, अतुल इनामदार, राधिका बोरलीकर, मनसेचे बाळा दानवले, ओंकार पाटोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नीलेश शिंदे, स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र हिंगे, श्रीधर दैठणकर, शर्मिला महाजन, हेमंत पटवर्धन, गणेश बोरा, चिंतामणी गणपती ट्रस्टचे विलास पाटणे, जगन्नाथ वैद्य, शिवसेनेचे राजीव मेनन, जयेश मोरे, रमेश सरदेसाई, सुशांत बुचके, जी. ए. ढोरे, अनिल मळेकर, अमित कांबळे, मिलिंद रचपुत, गणेश जाधव, अजय मोरे, भागवत नागपुरे, रुद्र बैरागी, ऋषिकेश कांबळे आदी उपस्थित होते.
या प्रकल्पामुळे पदपथ रूंद केल्यास वाहतूककोंडी होणार आहे. पदपथावर टपरी व हातगाड्यांचे अतिक्रमण झाल्याने पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालता येणार नाही. स्मार्ट सिटी, अर्बन स्ट्रीट डिजाईनच्या नावाखाली अनेक रस्ते रूंद करून पदपथ व सायकल ट्रॅक प्रशस्त बनविण्यात आले आहेत. त्यामुळे कोंडीत भर पडत आहे. त्याच प्रकारच्या हरित सेतू प्रकल्पाला नागरिकांचा विरोध आहे.
विरोध दर्शविण्यासाठी सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे. सह्यांचे पत्र व हरकतीचे निवेदन महापालिका आयुक्तांना दिल्यानंतर प्रकल्पाबाबत सकारात्मक तोडगा न काढल्यास विविध प्रकारे आंदोलन छेडले जाईल. नागरिकांमध्ये जनजागृती करून, न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.





