Pimpri-Chinchwad : डम्परच्या मागे नंबर प्लेट कुठे? पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर धावणाऱ्या अवजड वाहनांवर प्रश्नचिन्ह
Pimpri-Chinchwad : अपघात झाला तर वाहन ओळखणार कसे?

पिंपरी – पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर धावणाऱ्या डम्परच्या मागील बाजूस नंबर प्लेटच दिसत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. काही डम्परच्या मागे अधिकृत नोंदणी क्रमांकाऐवजी इतर कोड किंवा क्रमांक दिसतात. त्यामुळे अपघात किंवा वाहतूक नियमभंग झाल्यास वाहनाची ओळख पटविणार कशी, असा सवाल उपस्थित होत आहे.
तसेच अवजड वाहनचालक अनेकदा बेदरकारपणे वाहन चालवतात. त्यामुळे अपघात घडतात. त्यांना पकडण्यासाठी वाहनांची नंबर प्लेट हा एकमेव पर्याय पोलिसांसमोर असतो. मात्र, नंबर प्लेटच नसल्याने अशी अवजड वाहने शोधणार कशी असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मोटार वाहन विभागाच्या नियमानुसार वाहनाचा नोंदणी क्रमांक पुढील आणि मागील बाजूस स्पष्ट व वाचनीय असणे आवश्यक आहे. नंबर प्लेट नसणे किंवा ती अशा पद्धतीने लावणे की क्रमांक वाचता येणार नाही, हा गंभीर वाहतूक सुरक्षेचा मुद्दा ठरू शकतो. मात्र, मोरवाडी येथे रस्त्यावर दिसून आलेल्या एका डम्परच्या मागील बाजूस स्पष्ट नोंदणी क्रमांकाची प्लेट दिसत नाही.
दुसऱ्या छायाचित्रातही वाहनाच्या मागील भागावर अधिकृत नंबर प्लेट असल्याचे स्पष्टपणे दिसून येत नाही. त्यामुळे संबंधित वाहनांची तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. डम्परचा वापर प्रामुख्याने बांधकाम साहित्य, माती, खडी आणि इतर अवजड माल वाहून नेण्यासाठी होतो.
अनेकदा अशा वाहनातून रॉयल्टी न भरता मरूम वाहतूक केली जाते. जरी महसूल विभागाने पाठलाग केला तरी वाहनाचा नंबरवरून कारवाई होऊ नये म्हणून मागील बाजूस नंबरप्लेट लावली जात नाही. शहरातील अरुंद रस्त्यांवरही या वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे अशा वाहनांची ओळख स्पष्ट असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
विशेषतः अपघाताच्या वेळी नंबर प्लेट महत्त्वाचा पुरावा ठरतो. वाहनचालक वाहन घेऊन पळून गेल्यास त्याचा शोध घेण्यासाठीही नोंदणी क्रमांकाचा उपयोग होतो. नंबर प्लेटच नसेल तर तपास यंत्रणेसमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. पिंपरी-चिंचवडमध्ये धावणाऱ्या डम्परची विशेष तपासणी मोहीम राबवावी.
प्रत्येक वाहनाची नंबर प्लेट, आरसी, विमा, पीयूसी आणि इतर आवश्यक कागदपत्रे तपासावीत. नंबर प्लेट अस्पष्ट किंवा नियमबाह्य आढळल्यास आरटीओ प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
वाहतूक पोलिसांचा आशिर्वाद?
शहरातील अवजड वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्त मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
रस्त्यावर धावणाऱ्या प्रत्येक वाहनाची ओळख स्पष्ट असणे ही केवळ कायदेशीर बाब नाही; ती नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित बाब आहे. विशेष म्हणजे वाहतूक पोलिसांच्या डोळ्यांसमोरून अशी वाहने जात असताना त्यावर काहीच कारवाई केली जात नसल्याने त्यांना वाहतूक पोलिसांचा आर्थिक आर्शिवाद असावा, अशी चर्चा शहरात सुरू आहे.





