पिंपरी चिंचवड – शेकोटीमध्ये प्लॅस्टिक, टायरचा वापर ! प्रदूषणात होतेय वाढ

जाधववाडी, दि. 5 (वार्ताहर) – पिंपरी चिंचवड शहर आणि उपनगरांमध्ये दिवसेंदिवस थंडीचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे शहरासह उपनगरांमध्ये शेकोट्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. परंतु शेको7व8 वसर्ए1टी पेटविण्यासाठी तसेच त्याला लागणारे इंधन म्हणून प्लॅस्टिक व टायरचा वापर होत असल्याने वायू प्रदूषणात वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक दुर्गंधीने त्रस्त आहेत.
उपनगरांमधील शेती देखील नामशेष होत असल्याने शेकोटीसाठी पालापाचुळा तसेच वैरण व लाकडे मिळत नसल्याने बहुतांश ठिकाणी शेकोटी पेटविल्यानंतर इंधन म्हणून प्लॅस्टिक पिशव्या, पुठ्ठे, टायर तसेच घरातील फायबरच्या वस्तूंचा वापर करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी बांधकाम साइटवर सिमेंटच्या मोकळ्या गोण्यांचा वापर शेकोटीसाठी करण्यात येत आहे. त्यामुळे कुदळवाडी, जाधववाडी, चिखली आदी परिसरात रात्री धुराचे प्रमाण वाढले आहे. टायर, प्लॅस्टिक आदी वस्तूंचा इंधन म्हणून वापर केल्याने परिसरात वायू प्रदूषण तर होतच आहे परंतु दुर्गंधी पसरत असल्याने येथील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
शेकोटी जरूर करा परंतु शेकोटी म्हटले की कागद, लाकूड व प्लॅस्टिक हे समीकरण आलेच. शक्यतो सुखलेल्या लांकडांचा वापर करा. प्लॅस्टिकचा वापर तर नकोच, शेकोटी पेटविण्याकरिता वाळलेला पालापाचोळा वापरता आला तर उचितच आहे. प्लॅस्टिक जळाल्याने अनेक प्रकारचे विषारी धूर निघून श्वास घेण्यास अडचण येते. प्लॅस्टिक ज्वलनामुळे कॅन्सरच्या जिवाणूंची निर्मिती होते, असे एका संशोधनात समोर आले आहे. त्यामुळे प्लॅस्टिकचा वापर टाळणे आवश्यक आहे.
– वैष्णवी पाटील, वृक्षप्रेमी, राजेशिवाजी नगर.
सुरक्षा रक्षकांना शेकोटीचा आधार
चिखली, जाधववाडी, मोशी, कुदळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर सिमेंटचे जंगल निर्माण झाले आहे. प्रत्येक सोसायटीला सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. हे सुरक्षा रक्षक रात्री थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटीचा आधार घेत आहेत. परंतु इंधनासाठी प्लॅस्टिक व टायर, सिमेंटच्या गोण्या वापरत असल्याने परिसरातील पर्यावरणावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. दिवाळीच्या फटाक्यांच्या धुरामुळे आधीच शहरात हवेची गुणवत्ता ढासळली असून त्यात आणखी नवी भर पडल्याने जाधववाडीकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
नागरिक त्रस्त
कुदळवाडी येथील भंगार व्यावसायिकांकडून तांबे काढण्याकरिता उघड्यावर वायरी जाळल्या जातात. भंगार व्यावसायिक अनेक प्रकारच्या भंगार साहित्य, काही न काही सातत्याने जाळीत असल्याने कुदळवाडी, जाधववाडी, मोशी परिसरातील सोसायटीतील नागरिक त्रस्त आहेत.सायंकाळच्या वेळेस धुराचे लोट कमी प्रमाणात दिसत असल्याने सायंकाळी वायर पेटविण्यावर अधिक भर असतो. त्यामुळे या परिसरातील
नागरिक त्रस्त आहेत.





