Pimpri Chinchwad Traffic Police: पोलिसांचा मोठा दणका! १५ दिवसांत १९ हजार वाहनांवर कारवाई; एक कोटी ८५ लाखांचा दंड वसूल
Pimpri Chinchwad Traffic Police: सुधारित सायलेन्सर आणि काळ्या काचा वापरणाऱ्यांवर पोलिसांचा विशेष निशाणा; हजारो वाहनचालकांना ठोठावला मोठा दंड.

Pimpri Chinchwad Traffic Police – वाहतुकीचे नियमभंग केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांकडून मागील १५ दिवसांमध्ये वाहतूक १९ हजार वाहनांवर कारवाई करत एक कोटी ८५ लाख १३ हजार ३०० रुपयांचा दंड आकारला आहे. पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात चाकण, भोसरी, तळेगाव हि औद्योगिक क्षेत्रे तसेच हिंजवडी, तळवडे, चिखली ही आयटी पार्क क्षेत्रे आहेत. देहु व आळंदी ही तीर्थक्षेत्र आहेत. शहर परिसरातून पुणे मुंबई द्रुतगती मार्ग, पुणे मुंबई महामार्ग, पुणे-नाशिक महामार्ग, मुंबई बेंगलोर महामार्ग हे प्रमुख मार्ग जातात.
त्यामुळे शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढलेली आहे. वाहनांची संख्या वाढल्याने वाहनांशी संबंधित अपघात आणि वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघनात देखील वाढ झालेली आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक विभागाकडून सातत्याने वेगवेगळ्या प्रकारची कारवाई केली जात आहे. जून महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये वाहतूक विभागाने तब्बल १९ हजार वाहन चालकांवर कारवाई केली. वाहनांना काळ्या काचा लावल्या प्रकरणी २५६२ कारवाया केल्या. सायलेन्सर मध्ये बदल करून मोठा आवाज करणारे सायलेन्सर असलेल्या १०१८ वाहनांवर कारवाई केली.
४ हजार ४४४ जड अवजड वाहनांवर कारवाई केली. शहरात अनेक ठिकाणी नो पार्किंग झोन निश्चित करण्यात आले आहेत. तरीही काही वाहन चालक नो पार्किंग झोन मध्ये वाहने पार्क करतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. अशा नो पार्किंग मधील १० हजार ६०७ वाहनांवर दोन आठवड्यात कारवाई केली आहे. मद्य प्राशन करून वाहन चालवणे गुन्हा आहे. तरीही काही वाहन चालवताना मद्य प्राशन करतात. अशा ४०४ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. या वाहन चालकांवर तब्बल एक कोटी ८५ लाख १३ हजार ३०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.





