Pimpri-Chinchwad: हजारो अवैध फटाके स्टॉल; पोलिसांचेही ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष
Pimpri-Chinchwad : नागरिकांचा जीव टांगणीला!

पिंपरी – दिवाळीच्या तोंडावर पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा एकदा भीषण आगीच्या संकटाला उघड आमंत्रण दिले जात आहे. अनधिकृत फटाके स्टॉल थाटू देऊ नका, अशा स्पष्ट आणि सक्त लेखी सूचना महापालिकेच्या अग्निशामक विभागाच्या उपायुक्तांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिल्या असतानाही, प्रशासनाच्या नाकावर टिच्चून शहराच्या गल्लोगल्ली हजारो अवैध फटाक्यांचे स्टॉल उभे राहिले आहेत.
महापालिका प्रशासनाची डोळेझाक आणि स्थानिक पोलिसांचे अर्थपूर्ण पाठबळ यामुळे दाट लोकवस्तीत फटाक्याच्या दारूचा जीवघेणा ढीग रचला गेला असून, निष्पाप नागरिकांचा जीव अक्षरशः टांगणीला लागला आहे.
शहराने फटाके आणि ज्वालाग्राही पदार्थांमुळे घडलेल्या भीषण दुर्घटना अगदी जवळून अनुभवल्या आहेत. ८ डिसेंबर २०२३ रोजी तळवडेतील ज्योतिबानगर येथे वाढदिवसाच्या स्पार्कलर मेणबत्त्या तयार करणाऱ्या बेकायदा कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत १४ निष्पाप कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता.
संपूर्ण देश हादरवून सोडणाऱ्या या घटनेनंतरही महापालिका जागी झाली नाही. याच वर्षाच्या सुरुवातीला, १ जानेवारी रोजी काळेवाडीत एका खासगी हॉस्पिटलच्या तळमजल्यावर थाटलेल्या फटाक्यांच्या दुकानाला अचानक भीषण आग लागली होती.
सुदैवाने रुग्णांचे प्राण वाचले, पण या घटनेने शहराच्या सुरक्षेचा पुरता बोजवारा उडाल्याचे सिद्ध केले होते. या दोन्ही घटना ताज्या असतानाही महापालिकेने त्यातून कसलाही धडा घेतलेला नाही.
पिंपरी-चिंचवड शहरात दरवर्षी दिवाळीच्या काळात हजारो लहान-मोठे फटाके स्टॉल गजबजलेल्या चौकांमध्ये, निवासी वस्त्यांमध्ये आणि पदपथांवर थाटले जातात. मात्र, अग्निशामक दल व महापालिकेकडून अधिकृतपणे नियम पाळून व्यवसाय करण्यासाठी गेल्यावर्षी अवघ्या १०५ जणांनाच परवानगी देण्यात आली आहे.
यंदा ही संख्या त्यापेक्षा कमी आहे. मग उरलेले हजारो स्टॉल कोणाच्या आशीर्वादाने उभे राहिले? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
या व्यवसायात अवघ्या काही दिवसांत लाखो रुपयांचा नफा मिळत असल्याने अनेक राजकीय पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी यामध्ये उघडपणे उतरले आहेत. कारवाईच्या फाईली हलण्यापूर्वीच वरदहस्त पुढे येतो आणि कारवाई थांबवण्यासाठी लोकप्रतिनिधी महापालिकेच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव आणतात.
दुसरीकडे, स्थानिक पोलीस ठाण्यांमधील बीट अंमलदारांपासून ते वरिष्ठ पातळीपर्यंत सर्वच ठिकाणी अर्थपूर्ण तडजोडी होत असल्याने या अनधिकृत स्टॉलचालकांना कोणाचेही भय उरलेले नाही. मात्र, यामुळे शहरातील नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे.
केवळ कागदी आदेश, मैदानात शून्य कारवाई
अग्निशामक विभागाच्या उपायुक्तांनी लेखी आदेश काढूनही क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून एकाही मोठ्या स्टॉलवर कारवाई केलेली नाही. सुरक्षेचे कोणतेही नियम न पाळता, अग्निप्रतिबंधक उपकरणे नसताना आणि दाट लोकवस्तीत खुलेआम बॉम्ब, रॉकेट आणि फटाक्यांची विक्री सुरू आहे.
एखाद्या दुकानात किरकोळ ठिणगी जरी पडली तरी आजूबाजूच्या इमारती क्षणात भस्मसात होतील, अशी अत्यंत स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासन आणखी एका तळवडेसारख्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.
‘महापालिकेने अनधिकृत फटाक्यांच्या दुकानांवर त्वरित कारवाई करावी, अशा लेखी सूचना सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आधीच दिलेल्या आहेत. तरीदेखील शहरात अवैध फटाके स्टॉल उभारल्याचे निदर्शनास आले आहे. या अनधिकृत दुकानांचा तात्काळ बंदोबस्त करण्यासाठी विशेष संयुक्त पथके तयार करण्यात येतील, ज्यामध्ये अग्निशामक दलाच्या प्रतिनिधीचा समावेश असेल. यासंदर्भातील अंतिम सूचना सोमवारी जारी करून धडक कारवाई सुरू करण्यात येईल.’- व्यंकटेश दुर्वास, उपायुक्त, अग्निशामक विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका
‘सर्व क्षेत्रीय कार्यालयांना लागलेल्या फटाक्यांच्या स्टॉलपैकी किती जणांना परवानगी आहे याचे सर्वेक्षण करण्यास सांगितले आहे. तसेच प्रत्यक्ष कारवाई देखील सुरू केली आहे. त्यामुळे नियमांचे पालन करून, महापालिकेची परवानगी घेऊन फटाक्याची दुकाने सुरू करावी. आगामी काळात महापालिकेकडून कठोर कारवाई केली जणार आहे.’ – अतुल पाटील, उपायुक्त, अतिक्रमण विरोध पथक.
मध्यवस्तीत फटाक्यांचे दुकान असल्यास संभाव्य धोके:
- किरकोळ ठिणगीने भीषण स्फोट होण्याची शक्यता.
- दाट लोकवस्तीमुळे आगीचा वणवा वेगाने पसरणे.
- रुग्णालये, शाळा व वृद्धांना प्रचंड धोका.
- अरुंद रस्त्यांमुळे अग्निशामक बंब अडकण्याची भीती.
- विषारी धुरामुळे नागरिकांना श्वसनाचा तीव्र त्रास.
- इमारतींमध्ये गॅस सिलिंडर असल्याने दुहेरी स्फोट.
- जीव वाचवण्यासाठी चेंगराचेंगरीची मोठी भीती.
- अग्निशामक यंत्रणा नसल्याने आगीवर नियंत्रण अशक्य.
- परिसरातील विद्युत तारांमुळे शॉर्टसर्किटचा धोका.
- कोट्यवधींचे आर्थिक नुकसान आणि मोठी जीवितहानी.
Pimpri-Chinchwad : रंग बदलणारे दिवे अन् बॉटल लाइटची चलती; घराघरांत रोषणाईची लगबग





