पिंपरी-चिंचवडमध्ये दोन दिवसांत 3760 करोनाबाधितांची नोंद

19 रुग्णांचा मृत्यू : 2601 जणांना डिस्चार्ज
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये दोन दिवसांत तब्बल 3760 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर 19 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 1 लाख 36 हजार 13 जणांना करोनाची लागण झाली आहे.
महापालिकेच्या पत्रकानुसार, रविवारी (दि. 28) शहरात 2275 जणांना करोनाची लागण झाली. तर 13 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये पिंपरी, थेरगाव, वाकड, भोसरी, चिंचवड, पिंपळे निलख, चिखली, पिंपरी, आकुर्डी व चऱ्होली येथील 12 जणांचा रविवारी मृत्यू झाला. तर पिंपरी-चिंचवडमध्ये उपचार घेत असलेल्या हडपसर येथील एका महिलेचा मृत्यू झाला. सोमवारी शहरामध्ये 1485 जणांना करोनाची लागण झाल्याची नोंद झाली. त्यामध्ये शहरातील 1472 व शहराबाहेरील 13 रुग्णांचा समावेश आहे.
तर आज 6 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 4 व शहराबाहेरील 2 जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 35, 44 आणि 48वर्षीय पुरुषाचाही समावेश आहे. तर शहराबाहेरील खडकी व मुंढवा येथील दोघांचा मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांमध्ये 2601 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 17 हजार 492 इतकी झाली आहे. तर आज दिवसभरामध्ये 4340 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले आहे. 2965 रुग्णांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 2816 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 13,728 वर पोहचली आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 16,544 इतकी आहे.





