Pimpri : स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी चिंचवड राज्यात प्रथम

पिंपरी पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्वच्छतेमध्ये यंदा राज्यात बाजी मारली आहे. केंद्र सरकारकडून दरवर्षी संपूर्ण देशभरात राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४ या राष्ट्रीय स्वच्छता स्पर्धेमध्ये शहराने देशात सातवा तर राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच ७ स्टार गार्बेज फ्री सिटी व वॉटर प्लस मानांकन मिळवत दर्जेदार कामगिरी केली आहे. गेल्यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये पिंपरी चिंचवड शहराला देशात तेरावा तर राज्यात तिसरा क्रमांक प्राप्त झाला होता.
स्वच्छ भारत मिशन (शहरी) अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयामार्फत दरवर्षी शहरांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, नागरिक सहभाग, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, शौचालये व मलनिस्सारण व्यवस्थेचे मूल्यांकन केले जाते. २०२४ च्या या स्पर्धेमध्ये ५ हजारहून अधिक शहरांनी भाग घेतला, त्यात पिंपरी-चिंचवड शहराने आपली सातव्या क्रमांकावर घोडदौड कायम ठेवत उत्कृष्ट कामगिरी बजावली.
महापालिकेच्या विविध उपाययोजनांमुळे संपूर्ण शहरात कचऱ्याचे योग्य प्रकारे संकलन, वर्गीकरण, पुनर्वापर आणि विल्हेवाट लावण्याचे कार्य नियमितपणे केले जात आहे. प्रत्येक प्रभागात घराघरातून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित केला जातो. स्रोताजवळ प्रक्रिया युनिट्स, कंपोस्टिंग, रीसायकलिंग प्लांट, बायोगॅस यंत्रणा आदींचा वापर केला जात आहे. यामुळे शहराने ७ स्टार कचरा मुक्त शहर (गार्बेज फ्री सिटी) हे प्रतिष्ठेचे मानांकन प्राप्त केले आहे.
शहरात मलनिस्सारणाची कार्यक्षम व्यवस्था, सीवेज ट्रीटमेंट प्लांट, नैसर्गिक जलस्रोतांचे संरक्षण आणि पुर्नवापर यामध्ये चांगली कामगिरी केली आहे. मलमूत्रमुक्त परिसर आणि पुनर्वापरासाठी प्रक्रिया केलेले पाणी वापरणे या निकषांमध्ये शहराने वॉटर प्लस प्रमाणपत्र मिळवले. स्वच्छतेच्या सर्व निकषांमध्ये काम करत शहराने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
नागिरकांचा सहभाग
स्वच्छ सर्वेक्षण यशस्वी होण्यासाठी केवळ महापालिकेचा नव्हे, तर शहरातील नागरिक, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, शाळा व उद्योगांचे मोठे योगदान लाभले. नागरिकांनी नियमित कचरा वर्गीकरण, प्लॅस्टिकचा कमी वापर, सार्वजनिक स्वच्छता यामध्ये सक्रीय सहभाग घेतला.
पिंपरी चिंचवड महापालिकेला स्वच्छ सर्वेक्षणमध्ये मिळालेला पुरस्कार कौतुकास्पद असून, आता पुढील उद्दिष्ट म्हणजे शाश्वत स्वच्छता, घनकचरा शून्य धोरण, जलपुनर्वापर आणि पर्यावरणपूरक शहर यासाठी प्रयत्न करणार आहोत.
– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त
पिंपरी चिंचवड महापालिकेला स्वच्छतेसाठी मिळालेला पुरस्कार कौतुकास्पद असून आरोग्य विभाग तसेच शहरातील नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे. येत्या काळात आणखी जोमाने पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ सुंदर करण्यासाठी तसेच पुढच्या वेळी देशात सर्वप्रथम क्रमांकावर घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
– सचिन पवार, उपायुक्त, आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका.





