Pimpri Chinchwad Police : निवडणूक संपली पण पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’ सुरूच; ४०० गुन्हेगार रडारवर, वाचा काय आहे प्लॅन
Pimpri Chinchwad Police : आयुक्तांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड पोलिसांची धडक मोहीम; जानेवारी महिन्यात ४७ सराईत गुन्हेगारांना शहरातून केले हद्दपार.

Pimpri Chinchwad Police – पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी निवडणूकीनंतरही पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जानेवारी २०२६ या महिन्यात तब्बल ४७ सराईत गुन्हेगार तडीपार/हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे. यासोबतच गंभीर गुन्ह्यांत सक्रिय असलेल्या दोन कुख्यात गुन्हेगारांना ‘एमपीडीए’ कायद्यान्वये एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.
ही कारवाई शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयच्या चारही परिमंडळांतर्गत पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली ही व्यापक प्रतिबंधक मोहीम राबविण्यात आली आहे. खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोड्याची तयारी,
खंडणीसाठी अपहरण, गंभीर दुखापत, महिलांवरील अत्याचार, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे तसेच तडीपार आदेशाचा भंग अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांविरोधात ही कारवाई करण्यात आली.
एमपीडीएअंतर्गत दोघांवर कठोर कारवाई
चाकण उत्तर व उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सक्रिय असलेले रजित लक्ष्मण येरकर (वय १९, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) आणि रामदास मारुती साळुंके (वय ३७, रा. आंबेठाण, ता. खेड) या दोघांविरोधात एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. त्यांना अनुक्रमे येरवडा व नागपूर मध्यवर्ती कारागृहात एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.
चार परिमंडळांत मोठी तडीपार मोहीम
परिमंडळ एकमध्ये १०, परिमंडळ दोनमध्ये ९, परिमंडळ तीनमध्ये १७ आणि परिमंडळ चारमध्ये ११ अशा एकूण ४७ सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्हा, पिंपरी-चिंचवड शहर तसेच काही प्रकरणांत रायगड जिल्ह्याच्या हद्दीबाहेर ठरावीक कालावधीसाठी तडीपार करण्यात आले आहे. हे गुन्हेगार प्रामुख्याने २० ते ५० वयोगटातील असून त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
४०० गुन्हेगारांवर पोलिसांची नजर
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या चार परिमंडळांतील २४ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात ४०० हून अधिक संशयित व सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांचे बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. दरम्यान, तडीपार करण्यात आलेले गुन्हेगार हद्दीत आढळून आल्यास नागरिकांनी तात्काळ ११२ नियंत्रण कक्ष किंवा जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
“सराईत गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासून परावृत्त करणे आणि नागरिकांची सुरक्षितता अबाधित राखणे हा आमचा उद्देश आहे. यासाठी पुढेही कठोर आणि परिणामकारक प्रतिबंधक कारवाई सुरू राहील,”
– विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड.





