Pimpri Chinchwad News : पिंपरी-चिंचवडमध्ये कोट्यवधींची उलाढाल! पाडव्याच्या मुहूर्तावर ‘या’ वस्तूंना सर्वाधिक मागणी
Pimpri Chinchwad News : मंदिरात वाहनांची पूजा अन् मिठाईच्या दुकानांत झुंबड; नववर्षाच्या सुरुवातीलाच बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण.

Pimpri Chinchwad News – गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पिंपरी-चिंचवड शहरात खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे चित्र दिसून आले. विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर व्यवहार झाले आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी दिवसभरात कोट्यवधींची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सणाच्या निमित्ताने नागरिकांनी सहकुटुंब खरेदी करत नववर्षाचे स्वागत केले. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर फ्रीज, एसी आणि कूलर खरेदीकडे ग्राहकांचा सर्वाधिक कल दिसून आला. मोठ्या क्षमतेचे फ्रीज तसेच एक ते दीड टन क्षमतेच्या एसीला विशेष मागणी होती. त्याचबरोबर वॉशिंग मशिन, मायक्रोवेव्ह ओव्हन आणि अन्य घरगुती उपकरणांचीही विक्री वाढली.
काही दिवसांपासून मंदावलेला बाजार पाडव्याच्या मुहूर्तावर पुन्हा तेजीत आल्याचे चित्र व्यापाऱ्यांनी सांगितले. टीव्ही खरेदीतही वाढ झाली असून, मोठ्या स्क्रीनचे अत्याधुनिक टीव्ही ग्राहकांनी पसंतीने घेतले. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानदारांकडून विविध सवलती, कॅशबॅक ऑफर्स आणि भेटवस्तू देण्यात आल्या. त्यामुळे खरेदीचा उत्साह अधिक वाढल्याचे दिसून आले.मोबाइल खरेदीतही लक्षणीय वाढ झाली असून, शहरातील शोरूम्स दिवसभर ग्राहकांनी गजबजून गेले होते.
वीस हजार रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या स्मार्टफोनकडे ग्राहकांचा कल असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. काही ग्राहकांनी प्रीमियम श्रेणीतील मोबाइल खरेदीस प्राधान्य दिल्याने या क्षेत्रातही मोठी उलाढाल झाली. दरम्यान, गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मिठाई बाजारातही चांगलीच उलाढाल झाली. श्रीखंड, पेढे, काजू कतली, मोतीचूर लाडू, रसगुल्ला, बासुंदी, रसमलाई यांसारख्या पदार्थांना मोठी मागणी होती. विशेषतः पेढ्यांच्या विविध प्रकारांना ग्राहकांची पसंती मिळाली.
नवीन वाहन खरेदी करणाऱ्या नागरिकांकडून पेढे वाटण्याची परंपरा कायम असल्याने मिठाई विक्रीत वाढ झाली. शहरातील सराफ बाजारातही सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळाली. अनेकांनी सोन्याचे दागिने खरेदी करत शुभमुहूर्त साधला. तसेच नवीन वाहनांची खरेदी करून पूजा करण्यासाठी मंदिरांमध्ये नागरिकांची उपस्थितीही मोठ्या प्रमाणावर दिसून आली. एकूणच, महागाई व इतर आर्थिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवरही गुढीपाडव्याच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड परिसरातील बाजारपेठा गजबजल्या असून, खरेदीच्या उत्साहाने नववर्षाचे स्वागत करण्यात आले.





