Pimpri Chinchwad News – भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) च्या वतीने मुंबई बंगलोर रस्त्यालगत असलेल्या सेवा रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी हजारो झाडांचा बळी घेतला जाणार आहे. शहरातील वाढती वाहतूककोंडी कमी करण्यासाठी सेवा रस्ता रुंदीकरण व सुसज्जीकरणाची योजना आखण्यात आली आहे. तसेच पुणे ते हिंजवडी मेट्रो मार्गिकेचे देखील काम सुरू आहे. त्यासाठी वाकड परिसरामध्ये मेट्रो स्टेशन उभारण्यात येत आहे. मात्र, या कामासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करावी लागणार आहे. परिणामी, एकीकडे हायवे सुसाट होत असताना शहरातील हजारो झाडे भुईसपाट होणार आहेत. महामार्गालगत सुर्या रुग्णालय, वाकड ते मुकाई चौक, किवळे मार्गावर दोन्ही बाजूंनी असलेल्या सेवा रस्त्यांचे रुंदीकरण, काँक्रीटीकरण, जलनिस्सारण व्यवस्था आणि पादचारी मार्ग विकसित करण्यात येणार आहेत. या प्रक्रियेत हजारो प्रौढ वृक्ष अडथळा ठरत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हे वृक्ष काढून टाकण्यात येणार असून त्यांचे पुनर्रोपण केले जाईल, असा दावा केला जात आहे. ही वृक्ष काढण्याबाबत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने महापालिकेकडे परवानगी मागितली होती. त्याअनुषंगाने उद्यान विभाग व शहरी दळणवळण विभागातील अधिकाऱ्यांनी पाहणी केली. पाहणीमध्ये रस्त्याचा विकास करत असताना अडथळा ठऱणारी झाडे काढण्यास एनएचएआयला परवनागी देण्यात आली आहे. त्यानुसार, तब्बल १३७५ झाढे मुळासकट काढून टाकण्यात येणार आहेत. विशेषतः वाकड येथील महापालिका हद्दीतील मेट्रो स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडे आहेत. महा मेट्रोच्या कामांना अडथळा ठरणारी काही झाडे देखील काढण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मेट्रो प्रकल्प, सेवा रस्ता आणि इतर पायाभूत सुविधा यांचा समन्वय साधताना झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. दरम्यान, प्रशासनाकडून झाडांचे पुनर्रोपण करण्यात येईल, प्रत्येक तोडलेल्या झाडाच्या बदल्यात अनेक झाडे लावली जातील, तसेच पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत राहील, असे आश्वासन देण्यात येत आहे. मात्र, पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, प्रौढ वृक्षांचे पुनर्रोपण करणे ही अत्यंत जिकिरीची प्रक्रिया असून त्यातील यशाचे प्रमाण कमी असते. अनेकदा कागदोपत्री पुनर्रोपण दाखवले जाते; प्रत्यक्षात झाडे जगण्याचे प्रमाण नगण्य असते, अशी टीका होत आहे. पिंपरी चिंचवड महापालिका वाकड, पुनावळे, ताथवडे, थेरगाव व पिंपळे गुरव या परिसरातील नागरिकांनी देखील या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे. शहरातील वाढते तापमान, कमी होत चाललेली हरितक्षेत्रे आणि वाढते प्रदूषण लक्षात घेता, हजारो झाडांची तोड हा पर्यावरणासाठी मोठा धक्का ठरेल, असे मत व्यक्त केले जात आहे. सेवा रस्ता विकसित करताना पर्यायी आराखडा तयार करून शक्य तितकी झाडे वाचवावीत, अशी मागणी होत आहे. प्रक्रिया पूर्ण, वृक्षांवर बुलडोजर दरम्यान, या प्रकल्पासाठी पर्यावरण विभागाची परवानगी, वृक्ष प्राधिकरणाची मान्यता आणि सार्वजनिक हरकतींची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत शहरातील या महाकाय वृक्षांवर बुलडोजर चालणार आहे. वृक्षतोडीपूर्वी नागरिकांचा अभिप्राय घेणे आणि पुनर्रोपणाच्या ठिकाणांची स्पष्ट माहिती जाहीर करणे आवश्यक असल्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. रस्ते विकासाची गरज मान्य असली, तरी हजारो झाडांच्या बदल्यात केवळ आश्वासनांवर समाधान मानायचे का, हा प्रश्न आता पिंपरी चिंचवडकरांसमोर उभा राहिला आहे. फक्त २४७ झाडांचे पुनर्रोपण उद्यान विभागाने दिलेल्या परवानगीनुसार, १३७५ वृक्षांपैकी फक्त २४७ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. उर्वरित ११२८ झाडे ही विदेशी व झुडपे स्वरुपाची असल्याने त्यांचे पुनर्रोपण करण्यात येणार नाही. या संपूर्ण १३७५ झाडांचे एकूण वय १६ हजार ४८६ असल्याने त्यांच्या वयाइतके १६ हजार ४८६ वृक्ष लावण्याचे बंधन एनएचएआयला आहे. मात्र, ते कितपत पूर्ण करणार यावर प्रश्नचिन्ह आहे. १६ हजार झाडे लावणार कुठे? पुनावळे येथे कचरा डेपोचे आरक्षण होते. त्याठिकाणी असलेल्या बपर झोनमध्ये झाडे लावण्याचे नियोजन आहे. मात्र, नवीन विकास आरखड्यामध्ये याठिकाणी असलेले कचरा डेपोचे आरक्षण काढण्यात आले असून त्याठिकाणी कमर्शियल कॉम्पलेक्सचे आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यामुळे याठिकाणी बपर झोन नसणार. त्यामुळे कोणत्या ठिकाणी वृक्षांचे पुनर्रोपण करणार व १६ हजार झाडे कुठे लावणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. “मेट्रो व सेवा रस्त्यांचा विकास करण्यासाठी अडथळा ठरणारी झाडे काढण्याची परवानगी उद्यान विभागाने दिली आहे. मात्र, संबंधित प्रशासनाला या झाडांचे पुनर्रोपण करणे व झाडांच्या एकूण वयाइतके १६ हजार वृक्ष लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मियावाकी पद्धतीने शहरात इतर ठिकाणी झाडे लावण्यात येणार आहेत.” – महेश गारगोटे, मुख्य उद्यान अधिक्षक.