Pimpri Chinchwad News – आखाती देशातील युद्ध थांबवावे व जगात शांतता नांदावी यासाठी संत तुकारामनगर येथे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष कामगार नेते यशवंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली जागतिक शांतता आवाहन रॅली संपन्न झाली. त्यांनी संत तुकाराम महाराज हॉल येथे श्रमिकांना संबोधित केले. या रॅलीमध्ये शेकडो श्रमिक सहभागी झाले होते. रॅली वेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. संत तुकाराम महाराज पुतळ्याचे दर्शन घेऊन रॅलीला सुरूवात करण्यात आली. त्यानंतर पंचशील बौद्ध विहारांमध्ये भगवान गौतम बुद्धांना वंदन करून पुढे श्री गणेश मंदिरात दर्शन घेतले. सर्व जाती धर्माच्या स्थळांना भेट देऊन जागतिक शांततेसाठी प्रार्थना करण्यात आली. मृत्यू झालेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीताने संत तुकाराम महाराज हॉल येथे रॅलीची सांगता झाली. यावेळी भाजपाचे शहर पदाधिकारी मंगेश धाडगे, मुन्ना बाविस्कर, दिनेश पाटील, दिपक पाटील, नंदू कदम, अमोल घोरपडे, शंकरराव शितोळे, ओंकार जोखारे, राहुल शितोळे, लता पाटील, अंकुश वाघमारे ,स्वानंद राजपाठक, ईश्वर गायकवाड, शंकरराव गावडे, सतीश एरंडे यांनी रॅलीचे आयोजन केले होते. जागतीक शांतता रॅलीला संबोधित करताना कामगार नेते यशवंत भोसले म्हणाले की, अमेरिकेने इजराइलच्या साह्याने इराणवर जो आघात केला त्यामुळे इराणचे प्रमुख नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. हवाई तळाची जागा ज्या देशाने युद्धासाठी उपलब्ध करून दिली त्या आखातातील सर्वच देशांना याचे परिणाम भोगावे लागले आहेत. युद्ध वाढल्यास याचे परिणाम सर्व जगाला भोगावे लागतील. बाजारातील सर्वच जीवन आवश्यक वस्तू महागतील याचा परिणाम भारतीयांना भोगावा लागेल. युद्ध नको शांतता हवी यासाठी जगातील पहिली जागतिक शांतता रॅली पिंपरी चिंचवड शहरात काढण्यात आली.