गावांचा बदलता चेहरा (चोवीसावाडी) : अंतर्गत रस्ते, वीजपुरवठा आदी सुविधा

भाजी मंडई, स्मशानभूमी, दवाखाना नसल्याने नागरिकांची गैरसोय

पिंपरी – चोवीसावाडी येथे अंतर्गत रस्ते, वीजपुरवठा आदी सुविधा झाल्या आहेत. भुयारी गटारे, भूमिगत विद्युततारा आदी कामे करण्यात आली आहेत. भाजी मंडईची सुविधा नसल्याने नागरिकांना भाजी खरेदीसाठी चऱ्होली गावात जावे लागते. परिसरात स्मशानभूमी नसल्याने नागरिकांना आळंदी हद्दीतील स्मशानभूमीत जावे लागते. महापालिकेचा दवाखाना नसल्याने देखील नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे.

चोवीसावाडी गावात फेरफटका मारल्यानंतर गेल्या 22 वर्षांत झालेला विकास आणि अद्यापही भेडसावणाऱ्या विविध समस्या नागरिक खुलेपणाने मांडतात. गावामध्ये सध्या सातवीपर्यंत शाळा आहे. दहावीपर्यंत शाळा होण्याची गरज आहे. येथील पदपथांवर हातगाडी, टपरीधारक यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालण्यात अडथळा होतो. सार्वजनिक स्वच्छतागृहाचा अभाव आहे. पुर्वी गावामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडीत होत होता. आता हे प्रमाण कमी झाले आहे. महापालिकेचा दवाखाना नसल्याने नागरिकांना उपचारासाठी भोसरी किंवा आळंदी येथे जावे लागते.

चोवीस तास पाणीपुरवठा योजनेची महापालिकेने अंमलबजावणी करावी. नागरिकांसाठी प्राधान्याने स्मशानभूमीची सोय व्हायला हवी. दाभाडे वस्ती ते चऱ्होली गाव रस्ता व्हायला हवा. चऱ्होली गावात भाजी मंडईची सोय आहे. मात्र, चोवीसावाडी येथे देखील ही सुविधा व्हायला हवी, अशा विविध सूचना दत्तात्रय तापकीर, शिवाजी भोसले, शारदा कोतवाल, शिवराज तुपे, दत्तु हजारे या नागरिकांनी केल्या. चोवीसावाडी येथे 11.74 हेक्‍टर क्षेत्रात विकासकामांसाठी 26 आरक्षणे टाकली आहेत. त्यातील 4.01 हेक्‍टर जागेचा ताबा मिळाला आहे. तर, 7.73 हेक्‍टर क्षेत्राचा ताबा बाकी आहे.

“विकासकामांसाठी आवश्‍यक आरक्षणे ताब्यात घेण्यात येत आहे. उद्यानाच्या जागेचा पुर्ण ताबा घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. खेळाच्या मैदानाच्या आरक्षणासाठी पाठपुरावा करीत आहे. अग्निशामक केंद्राचे आरक्षण ताब्यात आले आहे. त्याची निविदा निघेल. रुग्णालयाचे आरक्षण ताब्यात आलेले नाही. पुणे-आळंदी रस्त्याचे काम झाले आहे. चऱ्होली फाटा ते चऱ्होली गाव, तनिष आर्चिड सोसायटी ते इंद्रायणी नदी, चोवीसावाडी ते ताजणेमळा, चऱ्होली फाटा ते डुडुळगाव आदी रस्त्यांची कामे सुरू आहे. चोवीस तास पाणीपुरवठ्याची सोय व्हायला हवी.
– विनया तापकीर, नगरसेविका

काय हव्यात सुविधा

-खेळाचे मैदान, उद्यान, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, दवाखाना
-महापालिका शाळेत आठवी ते दहावीचे वर्ग सुरू करणे आवश्‍यक
-विकास आराखड्यातील आरक्षणांचा व्हायला हवा विकास

“गावामध्ये स्मशानभूमीची महत्त्वाची समस्या आहे. नागरिकांना अंत्यविधीसाठी आळंदीला जावे लागते. चोवीसावाडी येथील आरक्षित जागेवर स्मशानभूमी उभारावी. गावातील रस्त्यांच्या कामांना गती द्यायला हवी. विकासकामांच्या ज्या आरक्षणांचा ताबा मिळाला आहे, त्यांचा विकास व्हायला हवा.
– घन:श्‍याम खेडकर, माजी नगरसेवक

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.