पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची शहर कार्यकारिणी बरखास्त

पिंपरी – राष्ट्रवादी कॉंग्रेस युवकची शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे.राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाचे युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी सांगितले की, शहरातील युवक हा विचारधारेशी बांधील असून या बदललेल्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांच्या राजकीय व सामाजिक राजकीय चळवळीची गरज निर्माण झाली आहे. म्हणून शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची विद्यमान कार्यकारणी बरखास्त केली.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहरातील सर्व कार्याध्यक्ष, सर्व विधानसभा अध्यक्ष, शहर कार्यकारणीतील उपाध्यक्ष, सरचिटणीस, सचिव, संघटक, चिटणीस व शहर कार्यकारणी सदस्य, सर्व प्रभाग अध्यक्ष व वार्ड अध्यक्ष यांना पदमुक्त करण्यात येत आहे.
युवक अध्यक्ष शेख यांनी पत्रक काढून संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त केल्याचे सांगितले आहे. तसेच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारधारेनुसार काम करणाऱ्यांना पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आदींच्या उपस्थितीत नवीन कार्यकारणीची निवड करण्यात येईल, असेही शेख यांनी म्हटले आहे.





