पिंपरी चिंचवड : चिखली परिसरात हायटेन्शन केबल टाकावे

चिखली -चिखली येथील पाटीलनगर, डिफेन्स कॉलनी, धर्मराज नगर, मेमोर सोसायटी, अंजनीगाथा सोसायटी, क्रिस्टल कॉर्नर सोसायटी, ग्लोरिया सोसायटी, विस्टेरिया सोसायटी, साई वैकुंठ सोसायटी, बग वस्ती परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याने नागरिक त्रस्त आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी चिखली परिसरात 350 मी. हायटेन्शन केबल टाकण्याची मागणी विकासभाऊ साने सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विकास साने यांनी केली आहे.
त्यांनी या संदर्भात महावितरणचे भोसरी येथील कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, चिखली परिसरात हजारो नागरिक वास्तव्यास आहेत. ते नियमितपणे वीजबिल भरतात. त्यातून मोठा महसूल महावितरणला मिळतो. मात्र, नियमित वीजपुरवठा या भागांना कधीही मिळत नाही.
या परिसराची विद्युत वहिनी ही तळवडे भागाला जोडली आहे. परिणामी येथील वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. त्याऐवजी डिफेन्स कॉलनी ते चिखली बैलगाडा घाट या दरम्यान हायटेन्शन केबल जर टाकल्यास व चिखली गावठाण लाईनमधून या परिसराला विद्युत पुरवठा केल्यास या भागाची विद्युत समस्येपासून कायमची सुटका होऊ शकते.
ही बाब आपल्या विभागाने युद्धपातळीवर करण्याची आवश्यकता आहे. येत्या आठ दिवसांत आवश्यक ती उपाययोजना केली नाही तर, चिखलीमधील या परिसरात राहणारे सर्व संतप्त नागरिक आपल्या कार्यालयावर धडक मोर्चा काढतील असा इशारा विकास साने यांनी दिला.





