प्रभात वृत्तसेवा भोसरी – श्रावण सुरू होताच पिंपरी-चिंचवड परिसरातील मोकळ्या मैदानांमध्ये निसर्गाने जणू हिरवळीची झुलाच पसरली आहे. अविरत बरसणाऱ्या श्रावणसरी, पावसाचे तुषार, झाडाझुडपांतून वाहणारे ओढे, नदीकिनारी गर्द झाडी यामुळे शहरातील काही भागांना नवसंजीवनी लाभली आहे.किवळे, रावेत, वाल्हेकरवाडी, चिंचवड, पिंपळे सौदागर, चिखली, मोशी येथील नदी काठच्या परिसरातील झाडे सध्या श्रावणात डोलत आहेत. तसेच दुर्गा टेकडी, दिघीचा डोंगर, बापूजीवुवाचा डोंगर आदी परिसर पर्यावरण प्रेमी नागरिकांना साद घालत आहे. संतत पावसामुळे मोकळ्या मैदानातील हिरवा साज जणू अधिकच खुलून आला आहे. मॉर्निंग वॉक, सायकलिंग आणि ट्रेकिंगसाठी निघालेल्या नागरिकांना निसर्गाच्या या रूपाने अक्षरशः वेड लावले आहे.श्रावण सोमवारच्या निमित्ताने शहरातील रहाटणी, चिंचवड या भागातील महादेव मंदिरांत भक्तांची अलोट गर्दी होत आहे. तसेच ठिकठिकाणच्या महादेव मंदिरे बेलफुलांनी सजवलेली शिवमूर्ती, गूंजणारे हरहर महादेवचे जयघोष वातावरणात भक्तिभाव निर्माण करत आहेत. पावसाळ्याच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी अनेक नागरिक घोराडेश्वर डोंगरासह मावळ, मुळशी, खेडपासून जुन्नरपर्यंतचा जंगलसदृश भाग, तसेच धरणांसह धबधब्यावर फेरफटका मारत आहेत. अनेकांनी मोबाइलमध्ये निसर्गाचे सुंदर क्षण टिपले असून सोशल मीडियावर ‘श्रावण व्हाइब्स’ म्हणून हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.पावसात वाढलेल्या हौशी नागरिकांच्या संख्येचा विचार करता महापालिकेने सार्वजनिक स्थळी स्वच्छता मोहीम सुरू केली असून ट्रेकिंग रूटवर सुरक्षा फलक लावण्यात आले आहेत. पोलीस व वाहतूक विभागाकडून वाहतूक नियमनाची व्यवस्था केली जात आहे. नागरिकांना आवाहन निसर्गाचा उपभोग घेताना परिसरात कचरा करू नये. वनस्पतींची नासधूस टाळावी आणि स्थानिक पर्यावरणाचा आदर करावा, असे आवाहन पर्यावरणप्रेमी संघटनांनी केले आहे. श्रावणात फक्त देवाप्रती भक्तीच नव्हे, तर निसर्गाप्रतीही कृतज्ञता व्यक्त करण्याची वेळ असते. पिंपरी-चिंचवड शहरातील झाडांमध्ये, ओघळणाऱ्या पाण्यात आणि मंद वाऱ्याच्या गारव्यामध्ये निसर्ग प्रेमाने गवसतो आहे.तो अनुभवण्यास विसरू नका!