पिंपरी – एका कंटेनर चालकाने बेफाम वाहन चालवत जवळपास दहा ते बारा वाहनांना धडक दिली. १६ जानेवारी रोजी घडलेल्या या अपघातात जखमी झालेल्या एका लहान मुलीचा २३ जानेवारी रोजी मृत्यू झाला होता, त्यानंतर आता त्या मुलीच्या आईचा देखील उपचारा दरम्यान मंगळवारी (दि. ४) मृत्यू झाला. ४६ दिवस सुरू असलेली तिची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. पौर्णिमा अंबादास गाढवे (वय २९, रा. रासे, ता. खेड, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. जखमी महिलेवर पिंपरीतील एक खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना मंगळवारी (दि. ४) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास पौर्णिमा यांची प्राणज्योत मालविली. त्यामुळे चाकण येथील कंटेनर अपघातातील मृतांची संख्या आता दोन झाली आहे. अपघातानंतर आठ दिवसांनी म्हणजे २३ जोनवारी रोजी पौर्णिमा यांची नऊ वर्षीय मुलगी धनश्री अंबादास गाढवे हिचा पिंपरीतील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्रुान मृत्यू झाला. अपघातात जखमी पौर्णिमा यांची प्रकृती सुरूवातीलपासून गंभीर होती. एकाच कुटुंबातील दोघींचा मृत्यू झाल्याने रासे गावावर शोककळा पसरली आहे. आरोपीवर तीन गुन्हे दाखल – आरोपीने वाहतूकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत अनेक वाहनांना धडक दिली. तसेच पोलिसांच्या गाडीलाही धडक देत पोलिसांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याशिवाय शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी कंटेनर चालकाची चांगलीच धुलाई केल्याने त्यास पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले होते. रूग्णालयातून सुटका होताच पोलिसांनी त्याला अटक केली.