Pimpri Chinchwad Crime : पोलिसांची मोठी कारवाई! चैन स्नॅचिंग करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या; कोण आहेत हे चोरटे?
Pimpri Chinchwad Crime : पिंपरी-चिंचवड मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची धडाकेबाज कामगिरी; २०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींना ठोकल्या बेड्या.

Pimpri Chinchwad Crime – रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांना लक्ष्य करून गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून २८.५ ग्रॅम वजनाचे सुमारे चार लाख दहा हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच दीड लाख रुपये किमतीची दुचाकी असा एकूण पाच लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गणेश भारत गिरी (वय २२, रा. बीड) आणि सुमित सोपान चव्हाण (वय १९, रा. मेदनकरवाडी, चाकण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पिंपरी व दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८ फेब्रुवारी रोजी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने तपास सुरू केला.
सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते व त्यांच्या पथकाने आरोपींच्या ये-जा मार्गावरील तब्बल २०० ते २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून संशयितांची ओळख पटवली. तपासात गणेश गिरी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता पिंपरी, दिघी, निगडी आणि चिखली परिसरातील चार चैन चोरीच्या गुन्ह्यांची कबुली मिळाली.
पिंपरी व दिघी येथील गुन्हे त्याने रोहन जाधव याच्या साथीने, निगडीतील गुन्हा पंकज गणेश दिवटे याच्यासोबत, तर चिखलीतील गुन्हा सुमित चव्हाण आणि ओमकार रामेश्वर लाटे यांच्या मदतीने केल्याचे निष्पन्न झाले. सुमित चव्हाण याला अटक करून पुढील कारवाईसाठी चिखली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
गणेश गिरीविरुद्ध बीड जिल्ह्यातील शिवाजीनगर व अंबाजोगाई तसेच पुणे शहरातील विमानतळ पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्यावर यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आलेली आहे. मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाच्या या कारवाईमुळे शहरातील चैन चोरीच्या घटनांवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





