शिक्षक भरती घोटाळ्याचे पिंपरी-चिंचवड कनेक्शन

पिंपरी – पुणे जिल्ह्यातील एका शिक्षणसंस्थेतील शिक्षक भरती घोटाळ्याची अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दखल घेतली आहे. या घोटाळ्यात पिंपरी चिंचवड कनेक्शनही समोर आल्याने या प्रकरणाची जोरदार चर्चा आज शहरात रंगली होती.
आकुर्डी येथील एका शिक्षण संस्थेत काही वर्षांपूर्वी बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षक भरती करण्यात आली होती. काही शिक्षणाधिकाऱ्यांचे संगनमताने ही भरती झाल्याचे चौकशीत उघडकीस आले होते. दरम्यान या शिक्षण संस्थेतील शिक्षक भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांची घेवाण-घेवाण झाल्याने या प्रकरणाचीही चौकशी “ईडी’ करणार असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
त्यामुळे या चौकशीत कोणकोणते बडे मासे अडकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बोगस शिक्षक भरतीचा हा घोटाळा उघडकीस आणणारे पुणे जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांना “ईडी’ने चौकशीसाठी बोलाविले आहे. येत्या दोन ऑगस्टला शिक्षक भरती घोटाळ्यात नेमक्या कोणत्या व्यक्तींचा समावेश होता, याबरोबरच अन्य प्रकरणांबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे समजते. शिक्षक भरतीमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय “ईडी’ला आहे.
या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान अन्य सहभागींची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील आकुर्डी येथील एका शिक्षण संस्थेत काही वर्षांपूर्वी बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षक भरती करण्यात आली होती. काही शिक्षणाधिकाऱ्यांचे संगनमताने ही भरती झाल्याचे चौकशीत उघडकीस आले होते. त्यात 23 शिक्षकांची भरती बोगस झाल्याचे आढळले होते. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात 19 ऑक्टोबर 2019 रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यात पुणे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख, दत्तात्रय शेंडकर; तसेच पुणे महापालिकेच्या माजी शिक्षणाधिकारी रामचंद्र जाधव, प्रशासकीय अधिकारी मीनाक्षी राऊत, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे.
त्याशिवाय त्या संस्थांचालकांचा समावेश आहे. या शिक्षण संस्थेने उरुळी कांचन येथील त्यांच्या संस्थेत काही शिक्षकांची बोगस भरती केल्याचे दाखविले. त्या आधारावर राज्य सरकारकडून पगार काढून घेतले. त्यानंतर काही वर्षांनी त्याच शिक्षकांना पुन्हा आकुर्डी येथील संस्थेत समाविष्ट करून घेतले. त्यावरून बोगस शिक्षक भरती झाल्याचा प्रकार जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांनी उघडकीस आणला होता. भुजबळ यांच्या तक्रारीनुसार 28 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता इडीनेही या प्रकरणात लक्ष घातल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील कोणते मासे गळाला लागणार? इडीच्या चौकशीमध्ये कोण कोण अडकणार याबाबत चांगलीच चर्चा शैक्षणिक वर्तुळात रंगली आहे.





