पिंपरी – पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पिंपरी चिंचवड आयुक्तालयाला झुकते माप देण्यात आले आहेत. शहरातून नऊ पोलीस निरीक्षकांची आयुक्तालयाबाहेर बदली झाली तर 23 पोलीस निरीक्षक आयुक्तालयाला नव्याने लाभले आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची 15 ऑगस्ट 2018 रोजी नव्याने स्थापना झाली. सुरुवातीच्या काळात 15 पोलीस ठाणी होती. त्यानंतर चिखली पोलीस ठाण्याला मान्यता मिळाली. त्यानंतर आता शिरगाव, म्हाळुंगे (चाकण) आणि रावेत चौक्यांना पोलीस ठाणी म्हणून मान्यता मिळाली आहे. यामुळे पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांची संख्या 18 वर गेली आहे. नुकत्याच पोलीस निरीक्षकांच्या नियमानुसार व विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या. यामध्ये नऊ पोलीस निरीक्षकांच्या आयुक्तालयाच्या बाहेर बदल्या झाल्या आहेत. तर 23 पोलीस निरीक्षकांची शहराबाहेरून बदली होऊन ते पिंपरी चिंचवड आयुक्तालयात आले आहेत. आगामी काळात 17 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नावे सहायक आयुक्त पदोन्नतीसाठी गेली असून त्यापैकी किमान दहा पोलीस निरीक्षकांना बढती मिळण्याची शक्यता आहे. त्यांना बढती मिळाल्यानंतर त्यांची शहराबाहेर बदली होऊ शकते. शहरात बदली होऊन आलेल्यांपैकी सात निरीक्षक आयुक्तालयात हजर झाले आहेत.
पिंपरी चिंचवड आयुक्तालयातून केवळ एका सहायक निरीक्षकाची शहराबाहेर बदली झाली असून त्याबदल्यात 18 सहायक निरीक्षक आयुक्तालयास बदली होऊन आले आहेत. तर 10 पोलीस निरीक्षकांची आयुक्तालयाबाहेर बदली झाली असून 32 पोलीस उपनिरीक्षक आयुक्तालयास नव्याने मिळणार आहेत.
आणखी एका अपर आयुक्तांचे एक पद यापूर्वीच मंजूर झाले असून त्यामुळे दोन अपर आयुक्त शहरात असणार आहेत. तर सध्या तीन पोलीस उपायुक्त असून आणखी दोन पदांना शासनाने मंजूरी दिली आहे. याशिवाय चार सहायक आयुक्तही नव्याने शहराला मिळणार आहेत. तर सहायक आयुक्त नंदकुमार पिंजण हे याच महिन्यात निवृत्त होणार असून देहूरोड विभगाचे सहायक आयुक्त संजय नाईक पाटील यांचा दोन वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांची देखील बदली होणार आहे. तर तिसरे सहायक आयुक्त श्रीधर जाधव हे देखील नोव्हेंबर अखेर निवृत्त होणार आहेत.
तात्पुरता पदभार
सांगवी पोलीस ठाण्यातील दोन्ही निरीक्षकांची बदली झाल्याने तेथील तात्पुरता कार्यभार वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांच्याकडे दिला आहे. तर शिरगाव चौकीचा कार्यभार तळेगावचे पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांच्याकडे देण्यात आला आहे. पासपोर्ट विभागाचा कार्यभार पोलीस निरीक्षक मनिष कल्याणकर तर गुन्हे शाखा युनिट एकचा तात्पुरता पदभार पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्याकडे देण्यात आला आहे.