पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील १५ ते ३५ वयोगटातील युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कौशल्य आत्मसात करुन त्यांना योग्य नोकरी मिळवून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका कौशल्यम उपक्रम राबवित आहे. त्यासाठी १६ वॉव (वर्ड ऑफ वर्थ) केंद्रांमार्फत तरुणांना खात्रीशीर माहिती, करिअर समुपदेशन, व्यावसायिक कौशल्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. सीएसआर (व्यावसायिक सामाजिक जबाबदारी) फंडातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेला कोणत्याही प्रकारची आर्थिक झळ बसणार नाही, असा दावा अधिका-यांनी केला आहे.
युथ ॲण्ड बिझनेस ग्रोइंग टुगेदर संस्थेच्या वर्ल्ड ऑफ वर्थ उपक्रमांतर्गत जागतिक स्तरावर युवकांना रोजगारक्षम प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी उपलब्ध करुन देण्याचे काम केले जाते. या संस्थेसोबत पिंपरी-चिंचवड महापालिकेने करार केला आहे. ही संस्था आता पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील युवकांना शैक्षणिक पात्रतेनुसार व्यावसायिक प्रशिक्षण देणार आहे. एवढेच नाही, तर प्रशिक्षण पूर्ण करणा-या युवकांना संबंधित क्षेत्रात नोकरी मिळवून देण्यापर्यंत ही संस्था सहकार्य करणार आहे. युवकांमधील रोजगारक्षमता वाढविण्यासाठी स्पोकन इंग्लिश आणि कामासाठी आवश्यक डिजिटल कौशल्ये हे अभ्यासक्रम सेक्टरविषयक प्राथमिक अभ्यासक्रम म्हणून शिकवले जाणार आहे.
तंत्रज्ञानावर आधारित, अनुभवात्मक करिअर समुपदेशन हा उपक्रम व्हर्च्युअल, ऑगमेंटेड रिऍलिटी आणि एआय या तंत्रज्ञानाचा वापर करून शिकविला जाणार आहे. त्यामुळे तरुणांना नोकरीतील कामाचे स्वरूप आणि करिअरचा विकास यांतील फरक समजून घेता येणार आहे. कौशल्यम उपक्रमाच्या प्रशिक्षणासाठी शहराच्या विविध भागात १६ वॉव (वर्ल्ड ऑफ वर्थ) केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. त्यातील दोन वॉव केंद्र सुरु करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लवकरच त्याचे उदघाटन करण्यात येणार आहे. एक केंद्र १००० स्क्वेअर फूट जागेवर तयार करण्यात येणार आहे. सीएसआर फंडातून हे सेंटर सुरु करण्यात येणार असून, उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
लाईट हाऊसनंतर आता कौशल्यम
पिंपरी-चिंचवड महापालिकेने लाईटहाउस कम्युनिटीज फाऊंन्डेशन यांच्यासोबत सामुदायिक करार करुन कौशल्य विकास केंद्र सुरु केले आहे. शहरात लाईट हाऊसची ८ केंद्र सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि निगडी याठिकाणी लाईट हाऊस केंद्र सुरु असून, त्याअंतर्गत १८ ते ३० वयोगटातील शेकडो युवकांमध्ये व्यावसायिक कौशल्य विकसित केली जात आहेत. त्यानुसार युवकांना व्यावसायिक क्षेत्रात नोकरी उपलब्ध होत आहेत. मात्र, याअंतर्गत युवकांना बेसिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. त्याला कौशल्यम उपक्रमाची जोड मिळाल्यामुळे शहरातील युवकांना व्यावसायिक क्षेत्रात त्याचा अधिक फायदा होणार आहे.
ग्लोबल अपॉर्च्युनिटी युथ नेटवर्क (जीओवायएन) हा अनेक भागधारक असणारा जागतिक उपक्रमाचा समूह आहे. त्याअंतर्गत कौशल्यम उपक्रम सुरु करण्यात येत असून, शहरातील युवकांना आर्थिक संधी उपलब्ध करुन देण्यासाठी आधुनिक युगातील कौशल्याशी संबंधित प्रशिक्षण दिले जाणार आहे. शाळाबाह्य, बेरोजगार किंवा अनौपचारिक नोकऱ्यांमध्ये काम करणाऱ्या १५ ते ३५ वयोगटातील तरुणांना आर्थिक गती निर्माण करुन देणारा हा उपक्रम आहे. असा उपक्रम राबविणारी पिंपरी-चिंचवड महापालिका राज्यातील एकमेव महापालिका ठरली आहे.
– अजय चारठाणकर, उपायुक्त, समाज विकास विभाग