पिंपरी : चिंचवडगाव येथील क्रांतीवीर चापेकर वाडा स्मारकाचे उद्घाटन येत्या शुक्रवारी (दि. १८) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन सोहळ्यासाठी महापालिकेकडून नियोजन सुरु आहे. विविध अधिकार्यांना कामकाज वाटपाचे आदेश काढण्यात आले आहेत. क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या चिंचवडगाव येथील चापेकर वाड्याचे स्मारकात रुपांतर होत आहे. क्रांतीवर चापेकर स्मारक समिती व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने हे स्मारक होत आहे. य़ा वास्तूंमध्ये राष्ट्रीय संग्रहालय होत असून ऐतिहासिक, तसेच स्वातंत्र्य समरातील विविध वस्तूंचा समावेश करण्यात आलेला आहे. या स्मारकाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी दहा वाजता होणार आहे. या कार्यक्रमांसाठी महापालिकेच्या विविध अधिकार्यांना कामकाज वाटपाचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत. यामध्ये हुतात्मा चापेकर स्मारक, समरसता गुरुकुलम, प्रा. रामककृष्ण मोरे प्रेश्रागृह येथे कार्यक्रमाची तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी शहर अभियंत्यासह विविध अधिकार्यांवर जबाबदार्या सोपविण्यात आल्या आहेत.