Pimpri : व्यावसायिकांना रात्री बारापर्यंत परवानगी द्यावी

पिंपरी : राज्यातील शहरी भागात दुकानदारांना व हॉटेल व्यावसायिकांना रात्री बारा वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी. अशी मागणी पिंपरी चिंचवड व्यापारी महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री पिंपरी चिंचवडमध्ये आले होते. त्यावेळी महासंघाच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले. त्या निवेदनात म्हटले आहे की, वाढत्या शहरीकरणामुळे राज्यात रात्री बारा वाजेपर्यंत ग्राहकांची वर्दळ सुरू असते.
त्यामुळे, व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायाच्या वाढीची संधी मिळते. परंतु, पोलीस अधिकारी राज्यातील वेगवेगळ्या भागात दुकाने बंद करण्याच्या वेळांबाबत वेगवेगळे निर्णय घेतात. साधारणतः रात्री 10 ते 11 वाजताची वेळ देण्यात येते, यामुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे आणि ग्राहकांना आवश्यक वस्तू मिळविण्यासाठी अडचण निर्माण होते. सर्वसाधारणपणे, आगामी उन्हाळ्यात दुपारच्या उकाड्यात बाजारपेठेत ग्राहकांची संख्या कमी होते. त्यामुळे रात्री व्यवसाय करणे आवश्यक आहे.
सर्व राज्यात दुकानदारांसाठी व हॉटेल व्यावसायिकांना दुकान बंद करण्याची वेळ रात्री 12 वाजता केली, तर त्याचा फायदा राज्यातील सर्व व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांनाही होईल. असे निवेदनात नमूद केली आहे. मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनामुळे शासन याविषयी काय निर्णय घेते, या कडे व्यापारी वर्गाचे लक्ष लागले आहे. असे महासंघाचे अध्यक्ष कमलेश मुथा यांनी म्हटले आहे.





