Pimpri : निघृण खून करुन केले शरीराचे तुकडे; मोशीच्या खाणीत सापडले धड

पिंपरी : भोसरी येथील एका व्यक्तीचा खून करून त्याच्या शरीराचे तुकडे केले. हे तुकडे अज्ञात ठिकाणी फेकले असून केवळ धड मोशी येथील खाणीत फेकून दिले. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. २) सायंकाळी उघडकीस आली.
सिद्धराम प्रभू ढाले (वय ४५, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सिद्धराम यांच्या पत्नीने गुरुवारी (दि. ३) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धराम हे २९ मार्च रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास घरातून कामासाठी गेले ते परत आले नाहीत. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ते मिळून येत नसल्याने ३१ मार्च रोजी भोसरी पोलीस ठाण्यात सिद्धराम ढाले यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी शोध सुरु केला. मात्र ते आढळून आले नाहीत.
२ एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास मोशी येथील कानिफनाथ खडी मशीन समोरील खाणीमध्ये सिद्धराम यांचे केवळ धड होते. त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले असून चेहरा आणि डोक्याचा भाग तसेच डावा पाय, दोन्ही हात तोडले आहेत. हे तुकडे पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने इतर ठिकाणी टाकले आहेत. दिघी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.





