वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील इंदोरीजवळ असलेल्या प्रसिद्ध परंतु तितकेच धोकादायक पर्यटनस्थळ असलेला कुंडमळा पुन्हा एकदा अपघातामुळे चर्चेत आले आहे. यापूर्वी या ठिकाणी रांजणखळग्यात बुडुन पर्यटकांच्या मृत्यू झाल्याच्या घटना येथे घडल्या आहेत. परंतु रविवारी दुपारी येथील इंद्रायणी नदीवरील पूलच कोसळल्याने मोठा अपघात घडला. जुन्या आणि जीर्ण झालेल्या या अति अरुंद पुलावर अति उत्साही पर्यटकांनी गर्दी केली आणि पूल कोसळताच चाळीसहून अधिक पर्यटक नदीत कोसळले. यातील काहीजण वाहून गेल्याची भीती आहे, तर काहीजण पुलाला अडकले तर काही पुलाखाली दबले. सायंकाळी उशिरापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार तीन जणांचा अपघातात मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी आहेत आणि ३२ जण किरकोळ जखमी आहेत. जखमींवर जवळील खासगी, सरकारी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. दरम्यान अपघातात काहीजण वाहून गेल्याची भीती असून मृतांचा व जखमींचा आकडा वाढण्याची भीती आहे. अपघात घडल्यानंतर तातडीने सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. एनडीआरएफ, अग्निशामक दल, स्थानिक पोलीस, आपदा मित्र, स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी सर्वांनीच घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य व बचतकार्य सुरू केले. इंद्रायणी नदीवरील पूल हा स्थानिकांच्या रहदारीसाठी उभारण्यात आला होता. परंतु साधारण ३० वर्षे जुना हा पूल वाहतुकीस योग्य नव्हता. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली होती. तरीही रविवारी मोठ्या संख्येने पर्यटक याच पुलावर उभे होते. पुलावरून परिसर न्याहाळत होते आणि सोबत काही दुचाकीस्वार पुलावर होते. त्यामुळे जीर्ण झालेला पूल अतिवजनाने कोसळून ही दुर्घटना घडली. सुट्टीचा वार अन् पर्यटकांची गर्दी रविवार, वीकेंड असल्याने तसेच मावळ तालुक्यात रिमझिम पाऊस सुरू असल्याने वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक मावळ तालुक्यात आणि खासकरून कुंडमळा परिसरात आले होते. कुंडमळा हे ठिकाण पुणे शहराजवळ असल्याने पुणे, पिंपरी-चिंचवड आदी भागातून पर्यटक याठिकाणी आले होते. अपघात घडला त्यावेळी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास शंभर पर्यटक पुलावर असावेत, इतकी गर्दी होती. सोबत काही दुचाकी होत्या. प्रशासनाकडून अडवणूक न झाल्याने जीव धोक्यात घालून पर्यटक पुलावर गेले आणि दुर्दैवाने पूस कोसळला. कुंडमळा, इंदोरी येथे झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. जो पूल कोसळला तो पूल वाहतुकीसाठी बंद होता. परंतू उत्साही पर्यटकांनी सूचनांचे पालन न करता आपला जीव धोक्यात घातला आणि पुलावर गेले. अतीवजनाने जीर्ण झालेला पूल कोसळून ही दुर्घटना घडली. मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहे. मावळमध्ये यापुढे अशा घटना घडणार नाही, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणार आहोत. – सुनील शेळके, आमदार, मावळ साधारण तीस वर्षे जुना हा पूल होता. स्व. दिगंबर दादा भेगडे यांच्या प्रयत्नांतून पूल बांधण्यात आला होता. पुल जीर्ण झाल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तरीही पर्यटक पुलावर गेल्याने हा अपघात झाला. तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे, तर साधारण ३५ पर्यटक जखमी झाले असून त्यांना वाचविण्यात यश आले. यापुढे अशा घटना घडणार नाही, यासाठी प्रशासनाने योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. – संजय उर्फ बाळा भेगडे, माजी आमदार, मावळ मावळ तालुक्यात इंदोरी कुंडमळा येथे झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. जुना लोखंडी पूल कोसळून अपघात घडला, यात काहींना जीव गमवावा लागला, तर काही पर्यटक जखमी झाले. बचावकार्य सुरू असून निश्चित आकडा समोर आलेला नाही. परंतु काही दिवसांपूर्वीच मावळच्या सुरक्षित पर्यटनासाठी प्रशासनाची बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या. तसेच याठिकाणी पर्यटकांना देखील सूचना देत आवाहन करण्यात आले होते. परंतु त्यांच्याही दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडली. – श्रीरंग बारणे, खासदार, मावळ लोकसभा