Pimpri : पाण्याचा धर्म झाला बाटली बंद

पिंपळे गुरव : पूर्वी उन्हाळ्याच्या दिवसात वाटसरूंना पाणी पिण्यासाठी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, स्वःखर्चाने पाणपोई सुरू करत होते. परंतु, आता सर्वत्र जार व पाणी बॉटल्स विकल्या जातात. त्यामुळे बाजारपेठेतून पाणपोई गायब झाल्या असून पाणपोईचीही ओळख हरवत चालली आहे.
वाटसरूंना मोफत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी बसस्थानक, शासकीय कार्यालय, रहदारीचा रस्ता, आठवडे बाजार आदी ठिकाणी पाणपोई असायची. त्यामुळे गरीब, कष्टकऱ्यांची सोय होत होती. अलीकडे जारच्या माध्यमातून पाणी विकत मिळू लागल्याने पाणपोई नामशेष होत आहेत. मात्र ज्यांना बाटलीबंद पाणी विकत घेणे शक्य नाही, अशांची गैरसोय होत आहे.
त्यामुळे पाणपोई उपलब्ध करून देण्याची गरज आहे. पूर्वीच्या काळी घराबाहेर पडल्यानंतर रांजण, माठ, त्यावर लाकडी झाकणी आणि लाल रंगाचा ओला कपडा असायचा. तसेच, पाणी पिण्यासाठी रंगीबेरंगी प्लॅस्टिकचे ग्लास अशी पाणपोई असायची. आत मात्र अशी दृष्य फार क्वचितच बघायला मिळतात.
पूर्वी ठराविक कंपन्या मिनरल वॉटरच्या बाटल्या विकत होत्या. पाण्यातून खूप पैसे मिळतात हे माहिती झाल्याने अनेकांनी हा व्यवसाय सुरू केला आहे. परिसरातील हॉटेल, दुकानदार हे देखील जो जादा नफा देईल, त्याच्याच कंपनीच्या बाटल्या विक्रीसाठी ठेवतात. त्यातूनही काहीजण छापील किमतीपेक्षा अधिक दराने कुलिंग चार्जेसच्या नावाखाली पाण्याच्या बाटल्यांची जादा दराने विक्री करतात. त्यातूनही ग्राहकांनी खरेदी केलेले पाणी शुद्ध असेलच याचही खात्री कोणी देऊ शकत नाही.





