Pimpri : भिर्रर्रर्र… मावळात जत्रेच्या निमित्ताने बैलगाडा शर्यतींचा थरार

नाणे मावळ : आठ वर्षांच्या बंदीनंतर कायद्याच्या आधारे बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाली आणि बैलगाडा मालक व बैलगाडा प्रेमींमध्ये एक नवचैतन्य पसरले. शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर सबंध महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात शर्यतींचे आयोजन केले जात आहे.
बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळू लागल्याने गावोगावी जत्रा यात्रांच्या निमित्ताने बैलगाडा शर्यती उत्साहात संपन्न होत आहे. शर्यतीच्या निमित्ताने गावोगावी पै-पाहुण्यांची गर्दी उसळत आहे. सरासरी दीडशेहून अधिक बैलगाडा मालक शर्यतीत सहभाग घेतात. त्यांच्या बरोबर आलेले सहकारी, विविध प्रकारचे दुकानदार, बैलगाडा शौकीन आणि ग्रामस्थ यामुळे गावोगावी जत्रेला प्रचंड गर्दी होत आहे.
महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव व परंपरा म्हणजे शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा खेळ बैलगाडा शर्यत. शेतीच्या कामांमध्ये मदत करणारी बळीराजाची बैलजोडी म्हणजे शेतकऱ्यांचा जीव की प्राण असतो.
बदलत्या काळानुसार शर्यतीचे स्वरूप अधिकाधिक ग्लोबल होत आहे. लाखो रुपयांची बक्षीसे शर्यतीत मिळत असतात. यात अगदी टू व्हीलर पासून ते ट्रॅक्टर, जेसीबी पर्यंतची बक्षीस आता बैलगाडा शर्यतीमध्ये पाहायला मिळतात. हा बदल ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारा आहे.
– विजय शिवाजीराव टाकवे, बैलगाडा मालक
शेतीमध्ये काबाडकष्ट करीत असताना कामाच्या व्यापातून मोकळीक होण्यासाठी स्वतःचे व समाजाचे मनोरंजन व्हावे व त्याचबरोबर आपल्या नंदीचे कौतुक व्हावे या हेतूने महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधव बैलगाडा शर्यतीत सहभागी होतात.
बैलगाडा शर्यतींचे खास वैशिष्ट्ये
– थेट प्रदर्शनामुळे बैलगाडा शर्यत होत आहे ग्लोबल
– गावगाड्यात उपयोगास येतील अशी लाखोंची बक्षीसे
– शर्यतींचे भव्य आयोजन व बक्षीसांमुळे लोकप्रियतेत वाढ
– बैलगाडा शर्यतीचे मराठी समालोचन ठरते आकर्षण
– गाडा मालक बनणे प्रतिष्ठेचे बनल्याने शौकिनांमध्ये वाढ





