Pimpri : कासारवाडी शाळेच्या आवारात उभारणार बालशिवाजी स्मारक

पिंपरी : छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावेत या हेतून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने कासारवाडी येथील महापालिका शाळेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. तसेच महाराजांच्या जीवनावर आधारित म्युरल्स देखील उभारण्यात येणार आहे. यामुळे महाराजांचा इतिहास विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने समजणार आहे. या कामासाठी सुमारे ३ कोटी रुपयांचा खर्च असून त्याला महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखऱ सिंह यांनी स्थायी समितीमध्ये मंगळवारी (दि. १८) मान्यता दिली.
शाळेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी ऑक्टोबर २०२४ मध्ये ३ कोटी ९२ लाख २१ हजार रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्ये ४ निविदाधारकांनी भाग घेतला. त्यापैकी मे. पी एन नगणे या ठेकेदारांने सर्वाधिक २४.४४ टक्के कमी दर दिला. त्यानुसार संबंधित ठेकेदाराची निविदा स्वीकारण्यात आली. त्यानुसार, संबंधित ठेकेदाराकडून रॉयल्टी चार्जेस व मटेरियल टेस्टिंग चार्चेससह २ कोटी ९६ लाख ७५ हजार ७२ रुपयांमध्ये काम करून घेतले जाणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल प्रेरणा जागृत व्हावी यासाठी महाराजांच्या जीवनावर आधारित म्युरल्स उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर किल्ल्यावर घेतलेली स्वराज्याची शपथ, मावळ्यांना सोबत घेऊन बालवयात केलेल्या लढाया, राज्याभिषेक याचे चित्रण केले जाणार आहे. विशेष म्हणजे शहरात बालशिवाजींचा उभारण्यात येणारा हा पहिलाच पुतळा असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहेत. त्यांना राजमाता जिजाऊंनी घडवले. त्यांच्या विचारांचा प्रभाव आजच्या पिढीवर असणे आवश्यक आहे. त्यासाठी कासारवाडी येथील महापालिका शाळेच्या आवारात हा पुतळा उभारण्यात येणार आहे. तसेच म्युरल्स देखील उभारण्यात येणार आहे. या कामांने शहराच्या नावलौकिकात भर पडणार आहे.
– शाम लांडे, माजी नगरसेवक.





