Pimpri : नोकरदारांना रिक्षा परवाना परत करण्याचे आवाहन

जाधववाडी : शहरातील काही नोकरदारांकडे रिक्षा परवाना (परमिट) असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता खासगी अथवा सरकारी नोकरी करत असाल आणि तुमच्याकडे रिक्षा परमीट असेल; तर ते ३० एप्रिलपर्यंत परत करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) करण्यात आले आहे. नोकरी करत असताना देखील रिक्षा परवाना असणाऱ्या नोकरदारांवर ३० एप्रिलनंतर कारवाई करण्याचा इशारा आरटीओने दिला आहे.
शहरात असंख्य नागरिक सार्वजनिक व खासगी वाहनांचा वापर करतात. नागरिकांच्या सोईसाठी राज्य परिवहन विभागाकडून खासगी वाहतुकीसाठी रिक्षाला परमीट दिले जाते. मोटार वाहन कायद्यानुसार हे परवाने दिले जातात. लोकसंख्या वाढीच्या प्रमाणात रिक्षा कमी असल्याचे लक्षात आल्यानंतर आरटीओकडून २०१७ मध्ये नवीन रिक्षांना परवाने देण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे अनेकांनी रिक्षा घेऊन परवाने घेतले. त्यामुळे रिक्षांमध्ये देखील स्पर्धा निर्माण झाली.
मोटार वाहन कायद्यानुसार तीन आसनी रिक्षा परवाना देताना संबंधित व्यक्ती सरकारी, निमसरकारी, निमसरकारी, खासगी कंपनी किंवा इतर कोणत्याही संस्थेत नोकरी करत नसल्याची अट आहे. रिक्षा परवाना देण्यासाठी संबंधित व्यक्तीकडून याबाबत प्रतिज्ञापत्र घेण्यात येते.
रिक्षा परवाना घेतल्यानंतर नोकरी मिळाल्यास त्या व्यक्तींनी त्यांचा रिक्षा परवाना स्वच्छेने परत करणे आवश्यक आहे. अशा व्यक्तींनी येत्या ३० एप्रिलपर्यंत रिक्षा परवाने परत करावेत, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.





