Pimpri : पवना नदीवर आणखी एका पुलाची भर पडणार

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील पवना नदीवर आणखी एका पुलाची भर पडणार आहे. मामुर्डी ते सांगवडे व हिंजवडीतील नागरिकांसाठी हा पूल महत्वाचे साधन ठरणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सध्या मामुर्डीहून हिंजवडी, सांगवडे तसेच मावळ तालुक्यात जाण्याकरिता लोखंडी पूल अस्तित्वात आहे. हा पूल अतिशय लहान आहे. एक लहान चारचाकी वाहन जात असल्यास दुचाकी देखील जाऊ शकत नाही, इतका अरुंद पूल आहे.
या पुलाचे आयुर्मान संपले असून, यावरून वाहनांना ये-जा करण्यास मनाई करण्यात आली आहे. तरीदेखील अनेक चारचाकी वाहनचालक जिवाचा धोका पत्करुन यावरून वाहने नेत आहेत. काही वर्षांपूर्वी पवना नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे हा पूल एका बाजूला कलला आहे. तर या पुलाची दुरवस्था झाल्याने किरकोळ मलमपट्टी करून या वरून आजही धोकादायक पद्धतीने सार्वजनिक वाहतूक सुरू आहे.
दरम्यान, या सर्व बाबींचा विचार करून महापालिका प्रशासनाने या पुलाला पर्याय म्हणून नव्याने याठिकाणी पूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता दोन निविदा प्राप्त झाल्या असून, मेसर्स. ए.आर. कन्ट्रक्शन या ठेकेदराची 14 लाख, 52 हजार, 730 रुपये रॉयल्टी चार्जेस व8 लाख, 88 हजार492 रुपये मटेरियल टेस्टिंग चार्जेससह एकूण 36 कोटी 66 लाख,10 हजार 37 रुपयांची निविदा मंजुर करण्यात आली आहे.
एका वर्षात काम पूर्ण करणार
याठिकाणच्या जुन्या लोखंडी पुलावरून जिवाचा धोका पत्करून होणारी वाहतूक लक्षात घेता, याठिकाणी 36 कोटी 66 लाख,10 हजार 37 रुपये खर्चुन नव्याने पुलाची उभारणी केली जाणार आहे. या पुलाचे काम ठेकेदाराला 12 महिन्यांत पूर्ण करावयाचे आहे. प्रभाग क्र. 16 मधील या कामाला 70 लाख रुपयांची तरतूद उपलब्ध आहे. तर ठराव क्र. 589 दि. 12/03/2024 नुसार 50 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.





