Pimpri : पालिकेच्या अधिकार्यांना एआयचे प्रशिक्षण

पिंपरी : राज्य शासनाच्या १०० दिवसीय विशेष उपक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सुयोग्य माहिती तंत्रज्ञानाचा प्रशासनातील प्रभावी वापर’ या विषयावर आधारित प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात महाराष्ट्र ज्ञान महामंडळचे मुख्य महाव्यवस्थापक समीर पांडे व पुणे आणि उत्तर महाराष्ट्र विभागाचे विभागीय व्यवस्थापक विनायक कदम यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महापालिकेच्या नागरी सेवा सुविधांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून प्रशासन अधिक गतिमान, कार्यक्षम व नागरिक केंद्रित बनविण्याच्या दृष्टीने प्रत्येक अधिकाऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करावा यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रशासनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून सेवांची गुणवत्ता, गती, पारदर्शकता आणि लोकाभिमुखता कशी वाढवता येते, याबद्दल प्रत्यक्ष उदाहरणांसह चर्चा करण्यात आली.
या प्रशिक्षणाद्वारे सहभागी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून चाटजीपीटी, डिजिलॉकर आणि इतर ई-गव्हर्नन्स टूल्सचे प्रशिक्षण देण्यात आले. महापालिकेच्या आगामी योजनांमध्ये यापैकी अनेक साधनांचा समावेश करून नागरिकांना अधिक चांगल्या सेवा पुरवण्याचा महापालिकेचा मानस आहे.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता हे भविष्यातील प्रशासनाचे बळ आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाशी परिचित करण्यात येत आहे. हे कौशल्य भविष्यातील पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी उपयोगी ठरेल. याशिवाय, हे प्रशिक्षण डिजिटल भारत मिशनच्या उद्दिष्टांशी सुसंगत असून, पिंपरी चिंचवड महापालिका डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने सकारात्मक पाऊल टाकत आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नव्या युगातील प्रशासनासाठी तयार ठेवणे ही काळाची गरज आहे.





