Pimpri : उमेदवारांकडून एआय प्रचार सुसाट; काल्पनिक व्हिडिओंमधून जननायक नेते तयार

Updated On:
Pimpri : उमेदवारांकडून एआय प्रचार सुसाट; काल्पनिक व्हिडिओंमधून जननायक नेते तयार

पिंपरी – शहरात सध्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून प्रत्येक उमेदवार आणि पक्षाकडून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारासाठी शेवटचे काही तास बाकी असताना राजकीय तोफा जोमाने पेटल्या आहेत. शहरातील प्रत्येक प्रभागात सभा, पदयात्रा आणि दारोदारी भेटीगाठी यांचा सपाटा लागला आहे. उमेदवारांसह शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध प्रकारचे मार्ग अवलंबले जात आहेत.

पोस्टर्स, बॅनर्स, जाहीर सभा आणि वाहन फेऱ्यांपुरता मर्यादित असलेला प्रचार आता वेगाने डिजिटल माध्यमांकडे वळला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उमेदवारांचा प्रभाव वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. यातच आता प्रचाराच्या शर्यतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या नव्या तंत्रज्ञानाने थेट उडी घेतली आहे.

सध्या अनेक उमेदवार आणि पक्षांकडून एआयच्या साहाय्याने लहान-लहान व्हिडिओ तयार केले जात आहेत. या व्हिडिओंमध्ये दोन मतदारांमधील संवाद, एखाद्या चहाच्या टपरीवर होणारी चर्चा, हा उमेदवार किती काम करतो, हा नेता आमच्या समस्या सोडवेल, अशा प्रकारच्या काल्पनिक दृश्यांची निर्मिती केली जात आहे.

काही व्हिडिओंमध्ये उमेदवाराला जनसेवेसाठी झटणारा, सामान्य माणसाच्या दुःखात सहभागी होणारा, रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा समाजसेवक म्हणून दाखवले जात आहे. तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांना होणारा त्रास, बेरोजगारी, महिलांना भासणारी असुरक्षितता, खराब रस्ते, पाणीटंचाई अशा समस्या दाखवून त्या समस्यांवर संबंधित उमेदवारच उपाय असल्याचा संदेश दिला जात आहे.

विशेष म्हणजे, हे सर्व व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक असतात. परंतु एआयमुळे तयार होणारे आवाज, चेहऱ्यावरील हावभाव, पार्श्वसंगीत आणि संवाद इतके वास्तवदर्शी असतात की सामान्य मतदार सहजपणे प्रभावित होतो. सोशल मीडियावर हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर होत असल्याने हा नेता खूप काम करतो, हा उमेदवार जनतेत लोकप्रिय आहे, असा समज तयार होतो.

अशा पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून काम करणारे नेते प्रत्यक्षात नसतानाही आभासी स्वरूपात तयार केले जात आहेत, अशी चर्चा मतदारांकडून केली जात आहे.

प्रचार आणि वास्तव यामधील दरी
एआयचा वापर प्रचारासाठी करणे, हे तंत्रज्ञानाच्या दृष्टीने चुकीचे नसले तरी त्याचा अतिरेक आणि दिशाभूल करणारा वापर धोकादायक ठरू शकतो. मतदारांपर्यंत पोहोचवला जाणारा संदेश वास्तवावर आधारित आहे की केवळ भावनिक परिणाम साधण्यासाठी तयार केलेली कथा आहे.

यामधील फरक ओळखणे सामान्य मतदारांसाठी अवघड होत चालले आहे. आज सोशल मीडियावर दिसणारा उमेदवार समस्या सोडवताना, लोकांसोबत उभा राहताना दिसतो. मात्र प्रत्यक्षात त्या उमेदवाराने आजपर्यंत त्या विषयावर काय केले, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे.

एआय प्रचारामुळे चर्चेला उधाण
शहरातील अनेक मतदारांकडून आता यावर थेट प्रश्न उपस्थित केले जात आहेत. निवडणुकीपूर्वी एआयच्या माध्यमातून इतकी मेहनत घेतली जात आहे, तर निवडून आल्यानंतर खऱ्या समस्या सोडवण्यासाठीही तेवढाच प्रयत्न केला जाणार का, फक्त व्हिडिओंमध्येच महिलांच्या सुरक्षेची चिंता दिसणार की प्रत्यक्षात रस्त्यावर दिवे, सीसीटीव्ही आणि पोलिसांची गस्त वाढणार, असे प्रश्न आता चर्चेत येऊ लागले आहेत.

एआय प्रचारामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक आकर्षक आणि आधुनिक होत असली तरी त्यामागे सत्य आणि जबाबदारी हरवत चालली आहे, लोकशाहीत मतदाराचा निर्णय हा काम, अनुभव आणि प्रामाणिकपणावर आधारित असावा, असे मत सुज्ञ मतदारांकडून व्यक्त केले जात आहे.

निवडणुकीनंतरची खरी परीक्षा
आज शहरात प्रचाराचा गदारोळ सुरू आहे, सोशल मीडियावर उमेदवारांची चमकदार प्रतिमा उभी राहत आहे. मात्र निवडणूक संपल्यानंतर हे एआय व्हिडिओ थांबतील आणि तेव्हा वास्तव समोर येईल. तेव्हा खरे काम करणारे कोण आणि केवळ प्रचारापुरते जननायक कोण, हे चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत मात्र शहरातील मतदारांनी आकर्षक व्हिडिओंपेक्षा खरे काम, पूर्वीचा अनुभव आणि विश्वासार्हता यावरच निर्णय घेणे गरजेचे आहे.

आणखी संबंधित बातम्या

AI Transform Designers: एआयने बदलली डिझायनरची दुनिया; कल्पकतेला तंत्रज्ञानाची जोड

2026-08-23 08:15:21

AI Transform Designers: एआयने बदलली डिझायनरची दुनिया; कल्पकतेला तंत्रज्ञानाची जोड

Festive season : साखरेचे भाव गगनाला; सणासुदीत दरवाढीचा फटका

2026-08-23 07:56:07

Festive season : साखरेचे भाव गगनाला; सणासुदीत दरवाढीचा फटका

Rajnath Singh : एआयच्या युगात डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची; मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले मत

2026-08-22 16:48:19

Rajnath Singh : एआयच्या युगात डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची; मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले मत

Newasa News : ‘विरंगुळा’वर खलबतं; विखे-गडाख भेटीने नगरच्या राजकारणात मोठा भूकंप होणार?

2026-08-15 22:40:45

Newasa News : ‘विरंगुळा’वर खलबतं; विखे-गडाख भेटीने नगरच्या राजकारणात मोठा भूकंप होणार?

Political News : राजकारणात मोठी खळबळ ! 'या' माजी मंत्र्याची पक्षातून हकालपट्टी

2026-08-13 19:06:26

Political News : राजकारणात मोठी खळबळ ! 'या' माजी मंत्र्याची पक्षातून हकालपट्टी