Pimpri : इंद्रायणी पाठोपाठ आता पवना नदीही फेसाळली

पिंपरी : इंद्रायणी नदी फेसळण्याच्या घटना नवीन नाहीत. मात्र, इंद्रायणीनंतर आता पवना नदीही गुरुवारी (दि. ६) थेरगाव घाटालगत पूर्णपणे फेसाळली आहे. रसायनमिश्रित पाण्याने नदी प्रदूषित झाल्याने काही दिवसांपुर्वी केजुबाई बंधाऱ्याजवळ मृत माशांचा खच सापडल्याने खळबळ उडाली होती. सध्या या पाणी फेसाळल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले असून, नदीप्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
शहराची जीवनदायिनी असलेली पवना नदी काही समाज कंटकांनी प्रदूषित करण्याचा विडा उचलला आहे. कंपन्यांच्या रसायनमिश्रित पाण्यामुळे नदी मृत होत चालली आहे. परंतु, या कंपन्यांना आवर घालण्यासाठी वाली उरला आहे की नाही, असा प्रश्न पर्यावरणप्रेमींनी केला आहे. केजुबाई बंधाऱ्यापासून ते मोरया गोसावी मंदिरापर्यंत सध्या मोठ्या प्रमाणात नदी पांढऱ्या रंगाने फेसाळली आहे. हा फेस पाण्यावर तरंगत आहे. फेस उगमापासून आहे की, मध्येच कुठे मिश्रित आहे याबाबत नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे. नियमितपणे शनिवारी व रविवारी हा प्रकार सर्रास घडत असूनही महापालिका प्रशासन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
थेरगाव येथील केजुबाई धरणात मोठया प्रमाणात माशांचा मृत्यू झाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. पवना नदीपात्रात रसायनयुक्त आणि मानवी मैला पाणी सर्रास सोडले जाते. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर जलपर्णी असून, दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करूनही, पवना नदी पत्रातील जलपर्णी तशीच राहते. जलपर्णी असल्याने पाण्यातील माशांना ऑक्सिजन मिळत नसल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. नदी प्रदूषणाच्या विखळ्यात सापडली असून नदी पुर्नजीवित करण्यासाठी कोणाचेही प्रयत्न दिसून येत नाही. असा आरोप सर्वस्तरातून होत आहे.
अधिकारी अनभिज्ञ
पवना नदी फेसाळली असल्याबाबत महापालिकेच्या एका वरिष्ठ जबाबदार अधिकाऱ्याला विचारले असता, याबाबत त्यांना काहीच माहीत नव्हते. त्यामुळे महापालिकेचा पर्यावरण विभाग पर्यावरणाबाबत कधी गंभीर आहे. याचा अंदाज येत आहे.





