Pimpri : अवकाळीचा आंब्यावर घाला!

जाधववाडी : पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात गेल्या १५ दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे केशर आंब्याच्या भावात तब्बल ५० टक्के घट झाली आहे. कधी १५० रुपये किलोने विकला जाणारा पिकलेला केशर आता ७०-८० रुपयांत तर कच्चा केशर ५० रुपयांपर्यंत खाली आला आहे.
पुणे जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या हवामानाच्या उलथापालथीमुळे केशर आंबा उत्पादक शेतकरी आणि विक्रेते संकटात सापडले आहेत. मोशी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात केशर आंबा विक्रीसाठी येत आहे. अवकाळीमुळे आंब्याचे फळ झाडावरून गळून सडत आहे. त्यामुळे फळाची चवही बिघडते. परिणामी, पिकलेला केशर आंबा आता केवळ ७० ते ८० रुपये किलो दराने विकला जात आहे, तर कच्चा आंबा ४० ते ५० रुपयांपर्यंत खाली आला आहे.
फळ विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार पावसामुळे नुकसान झाले तरी शेतकऱ्यांना ठरलेले पैसे द्यावेच लागतात. भाव पडल्यामुळे आम्हाला दुहेरी फटका बसतो. या पावसामुळे केवळ केशर आंबाच नव्हे, तर परिसरातील इतर फळझाडे व पिकांनाही फटका बसला आहे.
ग्राहकांचा फायदा
ग्राहकांसाठी मात्र ही संधी आहे. अनेक कुटुंबे दररोज आमरसासाठी आंबा घेऊन जात असून, कमी भावामुळे केशर आंबा सर्वसामान्यांच्या टेबलावर पोहोचला आहे. मात्र यामागे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान दडलेले आहे, हेही तितकंच खरं.





