Pimpri : लोणावळ्यात अवजड वाहन चालकांवर कारवाई

लोणावळा : बंदी असूनही लोणावळा शहरातून प्रवास करणाऱ्या जड – अवजड वाहनांवर वाहतूक विभागाने कठोर पावले उचलत दोन दिवसांत ४२५ कारवाया केल्या. यात एकूण ४ लाख ६७ हजार ५०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. पहिल्या दिवशी दोनशेहून अधिक वाहनांवर कारवाई करीत २ लाख ८ हजार तर दुसऱ्या दिवशी २२५ अवजड वाहनांवर कारवाई करून २ लाख ५९ हजारांचा दंड वसुल करण्यात आला.
लोणावळा शहरात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर जून २०२४ मध्ये जिल्हाधिकारी यांनी आदेश पारित करीत शहरातून होणाऱ्या जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीवर सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत कायमस्वरूपी बंदी घातली. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवीत शहरातून सर्रासपणे अवजड वाहने जात आहे. आठवड्यापूर्वीच एका अवजड वाहनामुळे झालेल्या अपघातात महिलेला तिचा जीव गमवावा लागला. त्यानंतर अवजड वाहनांचा विषय ऐरणीवर आल्याने शहर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.
पोलीस निरिक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभाग प्रमुख, पोलीस हवालदार अनिल शिंदे, सचिन कडाळे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल फाळके यांच्या मार्फत कारवाई सुरु करण्यात आली. वाहतूक विभाग व पोलीस प्रशासनाच्या या निर्णायक कृतीमुळे लोणावळेकर नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.
भाजपाचे शहराध्यक्ष अरुण लाड, जिल्हा सदस्य दीपक कांबळे, वैभव देशपांडे, उमेश तारे, सुरेश जाणिरे यांनी पुष्पगुच्छ देऊन पोलिसांचा सन्मान केला. तसेच भविष्यातही अशी कठोर कारवाई पोलिसांकडून सुरू राहील, अशी अपेक्षा अरुण लाड यांनी व्यक्त केली.





