Pimpri : श्री संत तुकारामच्या निवडणूकीसाठी 5 अर्ज बाद, 195 अर्ज वैध

हिंजवडी : कासारसाईतील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या जाहीर झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत 5 जणांचे अर्ज बाद झाले. तर एकाच गटात दोन-दोन अर्ज भरलेल्यांचा एक अर्ज छाननीच्या वेळी काढण्यात आला. त्यामुळे आता 21 जागांसाठी 195 उमेदवारी अर्ज वैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी दिली.
इच्छुकांमध्ये विविध पक्षांतील वरीष्ठ पदाधिकाऱ्यांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. या इच्छुकांना माघार घेण्यास लावणे ही पक्षश्रेष्ठींपुढे मोठी डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे यंदाची कारखाना निवडणूक बिनविरोध होणार की चुरशीची होणार याचा फैसला 25 मार्चला होणार आहे.
कारखान्याच्या निवडणूकीसाठी 226 जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यातील 26 अर्ज दुबार भरलेले होते.
त्यामध्ये सोमाटणे-पवनाननगर मतदार संघातून शांताराम वाघोले यांचा अर्ज स्वाक्षरी नसल्याने अवैध करण्यात आला. याच मतदार संघात मतदार यादीत नाव नसल्याने पोपट वाजे यांचा अर्ज बाद झाला. इतर मागास प्रवर्गातील ज्ञानेश्वर ठाकर यांनी सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला जातीचा दाखला जोडला नाही. तर हिंजवडी-ताथवडे मतदार संघातून सुनील शिंदे यांना दोनपेक्षा जास्त अपत्य असल्याने आणि खेड-हवेली- शिरूर मतदार संघातील सोमनाथ मुंगसे यांनी कारखान्यास ऊसपुरवठा न केल्याने त्यांचेही अर्ज बाद करण्यात आले. उर्वरीत 195 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
मुळशी तालुक्यातील पौड-पिरंगुट आणि हिंजवडी-ताथवडे गटात प्रत्येकी 17 अर्ज वैध झाले आहेत. मावळ तालुक्यातील तळेगांव-वडगाव गटात 23 आणि सोमाटणे पवनानगर गटात 37 अर्ज शिल्लक राहिले आहेत. खेड-हवेली-शिरूर मतदार संघात 30 अर्ज वैध झाले. महिला राखीव गटात 20, अनुसुचित जाती/जमाती गटात 8, इतर मागासवर्गीय गटात 35 तर विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गात 8 जणांचे अर्ज वैध ठरले आहेत.
25 मार्च ही अर्ज माघारीची शेवटची तारीख आहे. कॉंग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना आणि भाजपा या सर्वच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी देखील यंदा इच्छुक होत उमेदवारी अर्ज भरले आहेत. माघारीबाबत पक्षश्रेष्ठी इच्छुकांना कशापद्धतीने गळ घालतात यावरच बिनविरोध निवडणूकीचे गणित अवलंबून असणार आहे. त्यामुळे कारखाना बिनविरोध होतो की निवडणूकीत चुरस वाढणार यावर येत्या 25 मार्चलाच शिक्कामोर्तब होणार आहे.
तब्बल २३ हजार मतदार संख्या
मावळ तालुक्यात तळेगाव-वडगाव मतदार संघ २ हजार २१५, सोमाटणे पवनानगर मतदार संघात ३ हजार २१ असे एकूण ५ हजार २३६ मतदार आहेत. मुळशीतील पौड-पिरंगुट ३ हजार ५४६, हिंजवडी-ताथवडे ३ हजार ३०८ असे एकूण ६ हजार ८५४ मतदार आहेत तसेच अन्य खेड हवेली व शिरूर असे ऊस उत्पादक व अनुउत्पादक मिळून एकूण २२ हजार ९१७ सभासद या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत.





