Pimpri : पंचवीस दिवसात १० हजार हरकती

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराचा नवीन सुधारित प्रारूप विकास आराखडा (डीपी) १४ मे रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. आरखड्यातील आरक्षणांबाबत हरकती घेण्याची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवार (दि. ११) पर्यंत १० हजार हरकती महापालिकेस प्राप्त झाल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रासह पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून वर्ग करण्यात आलेल्या क्षेत्राचा एकत्रित प्रारुप विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यातून एमआयडीसी आणि पीएमआरडीएचे क्षेत्र वगळण्यात आले आहे. शहरातील एकूण २८ गावांच्या एकूण १७३.२४ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या या आराखड्यात शहरातील विविध प्रकल्पांसाठी आरक्षणे टाकण्यात आली आहेत. तसेच, सार्वजनिक सेवा व सुविधांसह नवीन प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत.
आरक्षणाबाबत नागरिकांकडून १६ मे रोजीपासून १४ जुलैपर्यंत असे ६० दिवसांच्या मुदतीमध्ये हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. दिवसेंदिवस हरकतींची संख्या वाढतच चालली आहे. बुधवारपर्यंत तब्बल १० हजारांपेक्षा अधिक हरकती महापालिकेस प्राप्त झाल्या आहेत.
त्यात सर्वांधिक हरकती या चिखली, एचसीएमटीआर (रिंग रोड) मार्गिका, मोशीतील कत्तलखाना, थेरगाव, वाल्हेकरवाडी, रहाटणी भागातील प्रस्तावित रस्ते, मोठे प्रकल्प, व्यापारी संकुल, हरित क्षेत्र कमी करणे आदींसाठी आहेत. काही ठिकाण गरज नसताना परस्पर आरक्षण टाकले आहे. तर, पूर्वीचे आरक्षण परस्पर रद्द करण्यात आले आहे. शेती आणि औद्योगिक क्षेत्रातही आरक्षणे टाकण्यात आली आहेत.
या ठिकाणी स्वीकारल्या जातात हरकती
विकास योजना आरखड्याबाबत लेखी स्वरूपात सूचना व हरकती महापालिका भवनातील चौथ्या मजल्यावरील आयुक्त कक्ष, तळ मजल्यावरील नगर रचना विभाग आणि खराळवाडी, पिंपरी येथील साईकृपा कमर्शिअल बिल्डींगमधील चौथ्या मजल्यावरील विशेष नियोजन प्राधिकरण कार्यालयात स्वीकारण्यात येत आहेत. विहित नमुना अर्ज त्या ठिकाणी मोफत उपलब्ध आहेत. सूचना व हरकती देण्यासाठी १४ जुलैपर्यंत मुदत आहे. अर्जासोबत आवश्यक नकाशे व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.





