Pimpri : दुचाकीस्वाराकडून 10 किलो गांजा जप्त

पिंपरी : दुचाकीस्वाराला अटक करून त्याच्याकडून पाच लाख 88 हजार रुपये किमतीचा 10 किलो 138 ग्रॅम गांजा, दोन मोबाइल, दुचाकी जप्त केली.
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गुरुवारी (दि. 20) पिंपळे सौदागर येथे ही कारवाई केली. हरिश मगन सोनवणे (27, रा. पिंपरीगाव, मूळ रा. वरवाडे, ता. शिरपूर, जि. धुळे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम गायकवाड आणि पोलिस अंमलदार पिंपळे सौदागर परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी संशयित हरिश सोनवणे हा दुचाकीवर सॅकबॅग व ट्रॅव्हलिंग बॅग घेऊन थांबलेला होता.
त्याचे नाव व तेथे थांबण्याचे कारण विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या संशयास्पद हालचालीवरून पोलिसांनी त्याच्या बॅगची तपासणी केली. बॅगमध्ये 10 किलो 138 ग्रॅम गांजा मिळाला.





