Pimpri : माथेरानमध्ये 181 मिमी पावसाची नोंद

माथेरान : माथेरानमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मागील सात तासांत 172.4 मिमी पावसाची नोंद झाली असून 24 तासांत तब्बल 181 मिमी पाऊस पडल्याचे अधिकृत माहिती मिळाली .
आज सकाळपासून विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू आहे. सकाळपासूनच प्रचंड पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला असून नागरिक आणि पर्यटकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वीज बंद असल्यामुळे मोबाईल नेटवर्कही ठप्प झाले आहे. त्यामुळे अनेकांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटला होता; तर काही काळासाठी ते नॉट रिचेबल झाले होते.
या अनपेक्षित पावसाने नागरिकांची चांगलीच भंबेरी उडाली आहे. तर शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तरीही, माथेरानच्या पावसाळी सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. पावसाळी पर्यटन हंगाम सुरू असल्यामुळे ही एक जमेची बाजू मानली जात आहे.
स्थानिक प्रशासनाकडून नागरिक व पर्यटकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसाचा जोर पुढील काही तास कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.





