Pimpri : बनावट पोलीस पडताळणी प्रमाणपत्र बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पिंपरी : बनावट पोलीस पडताळणी प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पिंपरी-चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोन एजंट आणि त्याच्या साथीदारांवर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही टोळी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांकडून मिळतील तेवढे पैसे घेऊन त्यांना बनावट पोलीस पडताळणी प्रमाणपत्र मोबाइलवरून पाठवत असे.
पिंपरी-चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेचे (एटीबी) पोलीस शहरातील लष्करी, सरकारी तसेच महत्वाच्या खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या खासगी व्यक्तींची माहिती जमा करीत आहेत. दिघी येथील टीसीएल कंपनीमध्ये काम करणाऱ्या वाहन चालक, हाऊस किपींग स्टाफ, सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी प्रमाणपत्रांची तपासणी करीत होते. त्यावेळी त्यातील काही कामगारांकडे बनावट पोलीस पडताळणी प्रमाणपत्र असल्याचे आढळून आले.
एटीबीने त्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांनी दोन एजंटना १२०० ते १६०० रुपये देऊन हे प्रमाणपत्र घेतल्याचे आढळले. एकूण ४१ पोलीस पडताळणी प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले. हे प्रमाणपत्र बनावट असल्याची कल्पना देखील संबंधित कामगारांना नव्हती. सहकारी मित्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कंपन्यांमधील कामगार आरोपींच्या मोबाइलवर संपर्क करत. त्यांना आवश्यक कागदपत्रे मोबाइल वर पाठवली जात. त्यानंतर १५ दिवसात संबंधित कामगाराच्या मोबाइलवर पोलीस पडताळणी प्रमाणपत्र येत असे.याबाबत एजंट संदीप बनसोडे (रा. येरवडा, पुणे), सुनील रोकडे (रा. पिंपळे गुरव) आणि त्यांना मदत करणाऱ्या इतरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी सन २०२१ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत हा गोरखधंदा केला आहे.
आपल्या आस्थापनेत काम करणाऱ्या कामगारांचे पोलीस पडताळणी प्रमाणपत्र खरे आहे का, याची खातरजमा संबंधित आस्थापना संचालकांनी जवळचे पोलीस स्टेशन, पोलीस आयुक्त कार्यालय अथवा दशतवाद विरोधी शाखेतून करून घ्यावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी केले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विकास राऊत, उपनिरीक्षक गायकवाड, अंमलदार पुंडलिक पाटील, अरुण कुटे, सुरज मोरगावकर, तुषार कदम यांनी केली.





