शिक्रापूर,(वार्ताहर)- पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील दोन रस्त्यांच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या स्थानिक युवकांच्या मागणीला पीएमआरडीएने प्रतिसाद देत १९५ कोटींच्या रस्ता कामांना मंजुरी दिली. रस्त्यासाठी आवश्यक भूसंपादनाचाही समावेश तरतूदमध्ये असल्याची माहिती उपोषणकर्त्या तरुणांसह आमदार अशोक पवार यांनी दिली. पिंपळे जगताप येथील करंदी फाटा ते भारत गॅस कंपनी व एल अॅंड टी फाटा ते करंदी या दोन्ही रस्त्यांच्या मागणीसाठी पिंपळे जगताप येथील युवकांनी ऑगस्ट महिन्यात पाच दिवसांचे साखळी उपोषण केले होते. दरम्यान, पंचायत समितीचे शाखा अभियंता अनिल गावडे व उपअभियंता डी. बी. राठोड यांनी आंदोलकांची भेट घेत रस्त्याच्या कामासाठीचे अंदाजपत्रक जिल्हा परिषदेकडे पाठविले होते. रस्त्यावर सुरू असलेल्या कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक सरपंच व पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. उपोषणकर्ते तथा आंदोलक श्रीपाद जगताप, अरुण जगताप, शामराव बेंडभर, सुभाष जगताप, संदीप जगताप, अशोक नाईकनवरे, चंदन सोंडेकर आदींनी पाठपुरावा सुरू ठेवला होता. आमदार पवार यांनी देखील पीएमआरडीएकडे पाठपूरावा सुरू केलेला असताना अखेर करंदी फाटा ते भारत गॅस कंपनी व एल अॅंड टी फाटा ते करंदी या दोन्ही रस्ताकामी १९५.८ कोटींची तरतूद केल्याचे आमदार पवार यांनी सांगितले. पिंपळे जगताप ग्रामस्थांचा रस्त्याचा मोठा प्रश्न मार्गी लागला आहे. पिंपळे जगताप येथील रस्त्यांसाठी पीएमआरडीएकडून सणसवाडी ते पिंपळे जगताप ४.५० किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी ७९.०८ लाख रुपये तर तळेगाव ढमढेरे तर एलअॅंड टी फाटा आणि पिंपळे जगताप ते करंदी फाटा या ९ किलोमीटरच्या रस्त्यासाठी ११५ कोटी रुपयांना मंजुरी दिल्याचे पत्र जारी केले आहे. दोन्ही रस्त्यांची रुंदी १८ मीटर एवढी प्रस्तावित असून सर्वसामान्य गतीशिलता (सीएमपी) योजनेतून मंजुर केल्याचे सांगण्यात आले.