Shirur : पिंपळे जगतापचे मार्केट एक लाख पार; धना- मेथीची आवक वाढली
Shirur : आगामी काळात पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याने पालेभाज्यांना चांगले दर मिळतील, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. मात्र, बाजारात कोथिंबीर आणि मेथीची आवक सातत्याने वाढल्यास मागणी आणि पुरवठ्यातील तफावतीमुळे बाजारभाव घसरण्याची शक्यताही अडतदारांकडून व्यक्त केली जात आहे.

केंदूर : शिरूर तालुक्यात दुष्काळाचे सावट कायम असताना पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील उपबाजारात कोथिंबीर आणि मेथीच्या जुड्यांची आवक वाढली आहे. गुरुवारी (दि. २२) कोथिंबिरीच्या तब्बल एक लाख सहा हजार जुड्यांची आवक झाल्याने बाजारात मोठी उलाढाल झाली.
शिरूर तालुक्यातील विविध भागांतून शेतकरी पालेभाज्या विक्रीसाठी पिंपळे जगताप उपबाजारात आणत आहेत. पाण्याची कमतरता जाणवू लागल्याने पालेभाज्या शेतात ठेवण्यापेक्षा वेळेत बाजारात विक्रीसाठी आणण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
सध्या कोथिंबिरीच्या एका जुडीला १५ ते २० रुपये, तर मेथीच्या एका जुडीला २५ ते ३० रुपये असा भाव मिळत आहे. आगामी काळात पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याने पालेभाज्यांना चांगले दर मिळतील, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. मात्र, बाजारात कोथिंबीर आणि मेथीची आवक सातत्याने वाढल्यास मागणी आणि पुरवठ्यातील तफावतीमुळे बाजारभाव घसरण्याची शक्यताही अडतदारांकडून व्यक्त केली जात आहे.
पिंपळे जगताप उपबाजाराचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असून, विदर्भ, मराठवाडा आणि मुंबई परिसरातील व्यापारी शेतमाल खरेदीसाठी येतात. व्यापाऱ्यांची मोठी उपस्थिती आणि शेतमालाला मिळणाऱ्या बाजारपेठामुळे शेतकऱ्यांना आपला माल लवकर विक्री करता येतो. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांसाठी हा उपबाजार महत्त्वाचे विक्री केंद्र ठरत आहे. आवक वाढल्याने पालेभाज्यांच्या बाजारभावात पुढील काळात काय बदल होणार, याकडे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
पिंपळे जगताप उपबाजारात कोथिंबीर आणि मेथीची आवक वाढत आहे. सध्या मागणी आणि आवक यानुसार बाजारभाव मिळत आहेत. मात्र, आगामी काळात आवक आणखी वाढल्यास पालेभाज्यांच्या दरावर परिणाम होऊन भाव घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारातील आवक आणि दरांचा अंदाज घेऊन शेतमाल विक्रीचे नियोजन करावे.
-बापूसाहेब गावडे, अध्यक्ष, अडतदार संघटना, पिंपळे जगताप.





