Pimple Gurav : उद्यानाची दूरवस्था, प्रशासनाचे दुर्लक्ष; राजमाता जिजाऊ उद्यानात ओपन जिमचे साहित्य नादुरुस्त

संगीता पाचंगे
पिंपळे गुरव – एकीकडे महापालिका स्वच्छता अभियानावर कोट्यवधीचा खर्च करत आहे. आपल्या विविध कार्यांसाठी पुरस्कार प्राप्त करत आहे. परंतु जमिनीवरील वास्तविकता प्रोजेक्टमधील फोटो आणि माहितीच्या विपरीत आहे. पिंपरी-चिंचवड शहर उद्यानांचे शहर म्हणून ओळखले जाते. परंतु उद्यांनाची दूरवस्था पालिका प्रशासनाची पोलखोल करत आहे. पिंपळे गुरव येथील राजमाता उद्यान पालिकेच्या उदासीनतेचे मूर्तीमंत उदाहरण आहे.
उद्यानाच्या पार्किंगमध्ये कचऱ्याचे साम्राज्य झाले असून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. झाडाच्या मधला व अडगळीतला कचरा उचलला जात नाही आणि झाडांच्या बुंध्याजवळ मोकळ्या तसेच कोपऱ्यात चहाचे कप, प्लॅस्टिक पिशव्या पसरलेल्या दिसतात. ओपन जिमचे साहित्य गंजले, तुटले आहे. उद्यानात कुत्र्यांचा सुळसुळाट आहे.
मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहराध्यक्ष आन्ना जोगदंड यांनी सांगितले की, मी स्वतः दररोज पहाटे उद्यानात जात असतो. उद्यानातील दूरवस्थेबाबत उद्यान विभागाचे कर्मचारी अजय जाधव यांना फोनवरून विचारणा केली असता उडवा उडवीची व खोटी माहिती दिली.
पार्किंगची स्वच्छता आरोग्य विभागाकडे आहे असे मला सांगितले, चौकशी केली आसता पार्किंगची स्वच्छता उद्यान विभागाकडेच असल्याचे कळाले. ड प्रभागाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी शांताराम माने फोनवर चर्चा केली त्यांनीही उद्यान विभागाची पार्किंग आहे त्यामुळे उद्यान विभागाने स्वच्छःता केली पाहिजे असे मत व्यक्त केले. उद्यानच्या ठेकेदारास मी स्वच्छता करण्यास सांगतो असे माने यांनी सांगितले.
यावरून उद्यान विभाग आपल्या कामाबाबत किती उदासीन आहे, हे दिसून येते. सामाजिक कार्यकर्ते जवळकर यांनी सांगितले की, उद्यानातील ओपन जिमचे साहित्य गेल्या चार महिन्यांपासून नादुरुस्त आहे. अनेक वेळा कर्मचाऱ्यांना सांगितले परंतु ते याकडे दुर्लक्ष करतात.
शशिकांत कदम म्हणाले की, ‘मी ही दररोज सकाळी उद्यानात जात असतो उद्यानामध्ये भटकी कुत्रेही फिरताना दिसतात नागरिकांच्या अंगावर जातात संरक्षक उंच भिंत असताना सुद्धा मुख्य दरवाजातून भटकी कुत्रे आत जातातच कशी? त्यामुळे उद्यान विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांनी जबाबदारीने लक्ष घालण्याची गरज आहे.’
‘आम्ही त्या ठिकाणी स्वच्छता करतो. त्यामुळे कचरा नसतोच. काही असेल तर पाहू.’ – अजय जाधव, सुपरवायझर, जिजाऊ गार्डन





