Pimple Gurav: पावसानंतर लक्ष्मीनगर परिसरात घाणीचे साम्राज्य
Pimple Gurav: सर्दी, खोकला आणि इतर साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता

पिंपळे गुरव – पिंपळे गुरव येथील लक्ष्मीनगर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे एक ते सात लाइनमधील अनेक भाग पाण्याखाली गेले होते. नदीकिनारी व दाट वस्ती असलेल्या या परिसरात नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने फर्निचर आणि इतर घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले.
पाऊस ओसरून चार दिवस उलटूनही परिसरात अपेक्षित स्वच्छता झालेली नसल्याने नागरिकांना दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे. घरातील खराब झालेले फर्निचर व इतर कचरा नागरिकांनी कचराकुंडीजवळ आणून ठेवला आहे. मात्र, हा कचरा अद्याप उचलण्यात आलेला नाही.
रहिवासी वर्दळीचा परिसर असल्याने येथे वाहनांची तसेच सकाळी पायी फिरणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत रस्त्यांवर पडून असलेल्या कुजलेल्या वस्तूंमुळे दुर्गंधी पसरली असून डास व चिलटांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
“वेळोवेळी पाऊस झाला, परंतु त्यानंतर तातडीने साफसफाई होणे गरजेचे होते. ती झालेली नाही. त्यामुळे परिसरात प्रचंड घाण आणि दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे,” असे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते शंतनू डोळस यांनी सांगितले.
दरम्यान, आरोग्य निरीक्षक रश्मी तुंडलवार यांनी मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात गाळ आणि कचरा परिसरात वाहून आला असून यंत्रणेवर ताण पडला आहे. स्वच्छता मोहीम सुरू असून काही ठिकाणी वेळ लागत आहे. नागरिकांनी थोडा संयम बाळगावा तसेच मोठ्या प्रमाणात कचरा रस्त्यावर टाकू नये.
प्रशासनाकडून सर्व कचरा उचलण्याचे काम सुरू आहे असल्याचे त्यांनी सांगितले. पावसानंतर परिसरात सर्दी, खोकला आणि इतर साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने पालिका प्रशासनाने तातडीने संपूर्ण साफसफाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.





