Vadgaon Maval : सभापतीपद मागास प्रवर्ग स्त्रीसाठी आरक्षित

वडगाव मावळ – मावळ पंचायत समितीचे सभापतीपद यंदा मागास प्रवर्ग महिला या आरक्षणाखाली आले आहे. पुढील अडीच वर्षे तालुक्याच्या ग्रामीण भागाचा कारभार महिला सभापतींकडे राहणार आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या सभापतीपदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीत मावळ पंचायत समितीचे सभापतीपद मागास प्रवर्ग स्त्रीसाठी आरक्षित झाले. मागील पंचवार्षिक काळात पहिली अडीच वर्षे मागास प्रवर्ग, तर पुढील अडीच वर्षे सर्वसाधारण महिला या आरक्षणाखाली कारभार झाला होता. त्यानंतर गेली तीन वर्षे प्रशासकीय कारभार सुरु असल्याने आता नव्या सभापतीबाबत उत्सुकता वाढली आहे.
पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या गट आणि पंचायत समिती गणांच्या जागांसाठीची सोडत सोमवारी (दि. १३) काढण्यात येणार आहे. त्याच दिवशी दुपारी १२ वाजता वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्समध्ये मावळ पंचायत समितीच्या १० जागांसाठी आरक्षण सोडत पार पडणार आहे. ही सोडत प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांच्या देखरेखीखाली, तसेच तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
या सोडतीत अनुसूचित जाती आणि जमाती यांना प्रत्येकी एक अशा दोन जागांचे आरक्षण संबंधित गणांमधील लोकसंख्येच्या प्रमाणावर निश्चित केले जाईल, तसेच नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी दोन जागा चिट्ठ्या काढून निश्चित करण्यात येतील. महिलांसाठीचे आरक्षणही याच पद्धतीने निश्चित होईल, अशी माहिती नायब तहसीलदार गणेश तळेकर यांनी दिली.





